19 फेब्रुवारीला पंचगंगा नदीची महाआरती
जेडी न्यूज नेटवर्क दत्तवाड
देशाचे गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत १९ फेब्रुवारीला होणाऱ्या महाआरतीनिमित्त महानगरपालिका प्रशासनाने पंचगंगा नदीकाठाची स्वच्छता, तसेच किरकोळ डागडुजी सुरू केली आहे.
कणेरी येथील सिद्धगिरी मठाच्या वतीने रविवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी पंचगंगा नदीच्या काठावर महाआरतीचे आयोजन केले आहे. पंचगंगा नदीची महाआरती यापूर्वी अनेक वेळा झाली असली तरी यावेळची महाआरती ही भव्य असणार आहे. या महाआरतीत रथीमहारथी सहभागी होणार आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार या महाआरतीत सहभागी होत आहेत.
महाआरतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. संपूर्ण पंचगंगेचा काठ स्वच्छ करण्यात आला असून काठावर, पाण्यात असलेली मंदिरे, स्वच्छ करण्यात येत आहेत. काठावरील काही फरशा निखळल्या असल्याने त्याची डागडुजी सुरू आहे. नदीकडे जाणारा रस्ता आणि पायऱ्यादरम्यान काँक्रिटीकरण केले जात आहे. काठावरील खराब झालेले लोखंडी ग्रील काढून त्याठिकाणी नवीन बसविले जात आहेत. सर्वच ग्रील रंगविण्यात आले आहेत.