शेतकऱ्यांनी शेती करताना शेतीचे बजेट मांडावे: माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निलेश मालेकर यांचे आवाहन कारदगा येथे ऊस पीक चर्चासत्र उत्साहात
शेतकऱ्यांनी शेती करताना शेतीचे बजेट मांडावे:
माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निलेश मालेकर यांचे आवाहन
कारदगा येथे ऊस पीक चर्चासत्र उत्साहात
शिरोळ /प्रतिनिधी:
शेतकऱ्यांनी शेती करत असताना शेतीचे बजेट अर्थात अर्थसंकल्प मांडले पाहिजे. बियाणे, खत, कीटकनाशक, तणनाशक, मजुरी, पाणी आणि इतर सर्व खर्च कमी करून चांगले उत्पादन कसे घ्यावयाचे यासाठी सूत्र निश्चित केले पाहिजे. शेतीशिवाय अन्य दुसरा कोणताच पर्याय नाही असे ठरवून ज्यावेळी आपण शेती करू तेव्हाच आपण उत्तम रीतीने शेती करू शकतो. त्यामुळे उत्पादन वाढ कशात होते आणि तोटा कशामुळे होतो याचा बारकाईने अभ्यास करून शेती करणे आवश्यक आहे, असे मत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निलेश मालेकर यांनी केले.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारदगा येथे आयोजित ऊस पीक चर्चासत्रात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भाऊसाहेब खोत होते.
डॉ. निलेश मालेकर पुढे म्हणाले, ऊस उत्पादन वाढीसाठी आवश्यक बाबींची शेतकऱ्यांनी माहिती घेतली पाहिजे. उसाच्या जाडी शिवाय टनेज येत नाही, त्यामुळे भरपूर ऊस भरपूर वजन हे चुकीचे असून उसाची संख्या नियंत्रित असायला हवी. अचूक खतमात्रा आणि अचूक तणनाशकाचा वापर केल्यास खर्चही कमी होतो. मशागत ते काढणीपर्यंतच्या अनावश्यक खर्चास फाटा देऊन जमिनीची सुपीकता आणि मुळांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक ती रासायनिक व सेंद्रिय खते दिली पाहिजेत. जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि जिवाणू यांच्यावरही उत्पादन किती येते हे ठरत असते त्यामुळे त्यांची संख्या आणि प्रमाण वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत.
श्री दत्तचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान शिकून स्वतः रोपे तयार करावीत. पाणी, खत, वेळ आणि सेंद्रिय कर्ब वाढ व इतर बाबींचे योग्य नियोजन करावे, असे सांगून शेतकऱ्यांची जमीन पुढच्या पिढीला शाबूत ठेवण्यासाठीच कारखाना लागेल ती मदत देण्यास तयार असल्याचे सांगितले. प्रारंभी स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन झाले. सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
स्वागत माती परीक्षक ए. एस. पाटील यांनी केले. प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश काशीद सर यांनी केले तर आभार प्रभाकर देसाई यांनी मानले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले.
यावेळी कारखाना व्हॉईस चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक शरदचंद्र पाठक, इंद्रजित पाटील, महेंद्र बागे यांच्यासह भाऊसाहेब चिंदके, अरविंद खराडे, देवाप्पा देवकते, सुभाष खोत, लक्ष्मण पसारे, आप्पासाहेब पाटील, सुदर्शन तकडे, संजय सुतार, अताउल्ला पाटील, राजू खोत, पदमराज पाटील, शशिकांत अर्जुनवाडे, प्रमोद देसाई, धनाजी चौगुले यांच्यासह शेती अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.