सुमंगल पंचमहाभूत महोत्सवाची दिमाखात तयारी
दत्तवाड न्यूज नेटवर्क
शेकडो एकर जमिनीवर उभा राहत असलेल्या वेगवेगळ्या संकल्पना, पंचमहाभूतांची ओळख करून देणाऱ्या प्रतिकृती, कारागिरांच्या सुबक कलाकृतीतून साकारणाऱ्या वेगवेगळ्या विषयावर आधारित मूर्ती आणि सुमंगलम पंचमहाभूत महोत्सवात कोणत्याही प्रकारची कसर राहू नये म्हणून प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवत मार्गदर्शन करणारे पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, हे चित्र आहे कणेरी मठ परिसरातील. पायाला भिंगरी बांधल्यासारखे काडसिद्धेश्वर स्वामीजी महोत्सवाच्या तयारीत व्यस्त आहेत. भल्या पहाटेला त्यांच्या दिवसाला सुरुवात होते. दिवसभर मिनिटभराचीही उसंत न घेता स्वामीजी महोत्सवाच्या तयारीसाठी परिसरात भ्रमंती सुरू असते. कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव होत आहे.
या महोत्सवसाठी विविध भागातील लाखो लोक सहभागी होणार आहेत. या महोत्सवामध्ये आकाश, पृथ्वी, वायू जल अशा पंचमहाभूत घटकांशी निगडित संकल्पना केंद्रस्थानी आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, संस्कार, शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये सामावून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
या महोत्सवासाठी कणेरी मठ परिसरात भारतीय संस्कृतीची ओळख दर्शवणारी नगरी वसत आहे. कणेरी मठाच्या जवळपास साडेपाचशे एकर परिसरात पंचमहाभूतांच्या प्रतिकृती, ग्राम संस्कृती, कृषी संस्कृती साकारत आहे. प्रत्येक घटकाशी निगडित आणि त्या घटकाशी पूरक मूर्ती यामुळे शिव मंगलम महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती येथे अवतरत असल्याचे चित्र तयार झाले आहे. महोत्सवाच्या सात दिवसाच्या कालावधीत लाखो नागरिक या ठिकाणी भेट देणार आहेत. या कालावधीत कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये या अनुषंगाने आहार, निवास, पाणी, रस्ते हे सगळ्या घटकांची सोय करण्यात येत आहे.
महोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या नियोजन कमिट्या तयार केले आहेत. प्रत्येकावर जबाबदारी सोपवलेली आहे. पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार सगळ्या कामांची पूर्तता होत आहे. प्रत्येक काम सुबक नियोजनबद्ध झाले पाहिजे हा स्वामीजींचा कटाक्ष आहे. भल्या पहाटे त्यांचा दिनक्रम सुरू होतो. सकाळी आठ वाजता नियोजन कमिटीसोबत बैठक, दिवसभराच्या कामाचे नियोजन यासंबंधी चर्चा होते. वेगवेगळ्या कामासाठी कारागिरापासून तज्ञांच्या पर्यंत सर्वांशी संवाद साधत, कधी मार्गदर्शन करत कामाला गती देत असतात. सुमंगलम महोत्सवाच्या तयारीचा एक भाग म्हणून या परिसरात वेगवेगळी कामे सुरू आहेत. प्रत्येक ठिकाणी कोणतीही कसर राहू नये याकडे ते लक्ष घालतात. सूचना करतात. जबाबदारी सोपविण्यात आलेल्या व्यक्तीकडे त्या कामाची चौकशी करतात. प्रत्येकाचा विषय वेगळा, प्रत्येकाला योग्य त्या सूचना करून महाराज मार्गस्थ होतात. सारा परिसर फिरून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतात. एकानंतर एक अशा पद्धतीने कामांची सोडवणूक सुरू असते. लोक भेटत असतात कोणाला आशीर्वाद देत, कोणाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत प्रत्येकाला प्रोत्साहन देण्याची पद्धत सगळ्यांचा हुरूप वाढवणारी असते. स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक घटक महोत्सव यशस्वी करण्यासाठी सरसावला आहे.