अजित पवारांनी शनिवारी दिवसभराचे कार्यक्रम अचानक रद्द केले
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्वीस्ट येणार का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत, कारण अजित पवारांनी शुक्रवार व शनिवारचे कार्यक्रम अचानक रद्द केले आहेत.
पुणे, 7 एप्रिल : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्वीस्ट येणार का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत, कारण अजित पवारांनी आज आणि उद्याचे कार्यक्रम अचानक रद्द केले आहेत. अजित पवारांनी शुक्रवार दिनांक सात पासून दुपारी 4 वाजल्यापासूनचे कार्यक्रम रद्द केले आहेत. अजित पवारांनी दुपारीच त्यांचा कॉनव्हॉय आणि स्टाफ सोडला आणि ते खासगी गाडीतून रवाना झाले आहेत. पण ते नेमके कुठे गेले आहेत, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आला आणि त्यांनी सगळे कार्यक्रम रद्द केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे त्यांना कॉनव्हॉय म्हणजेच गाड्यांचा ताफा आणि स्टाफ असतो. हा कॉनव्हॉय आणि स्टाफ अजित पवारांनी सोडून दिला आहे, त्यामुळे दादा नेमके कुठे गेले? याबाबत पुन्हा एकदा चर्चांना तोंड फुटलं आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातली सुनावणी संपली आहे, याचा निकाल आता कधीही येऊ शकतो, त्यातच आता अजित पवारांनी कार्यक्रम रद्द करणं आणि कॉनव्हॉय सोडणं, याचा नेमका अर्थ काय? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.