गणपतराव पाटील यांचे सेंद्रिय कर्ब वाढ आणि क्षारपडमुक्तीचे काम देशाला दिशादर्शक: डॉ. लॉरी वॉकर
गणपतराव पाटील यांचे सेंद्रिय कर्ब वाढ आणि क्षारपडमुक्तीचे काम देशाला दिशादर्शक: डॉ. लॉरी वॉकर
श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचे सेंद्रिय कर्ब वाढ आणि क्षारपड मुक्तीचे काम देशाला दिशादर्शक आहे. सेंद्रिय कर्ब वाढ व क्षारपड जमीन होण्याची कारणमीमांसा शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाच्या सिद्धतेवर काम करणे गरजेचे आहे. मिशिगन विद्यापीठ अमेरिका, सोमय्या विद्याविहार विद्यापीठ मुंबई आणि श्री दत्त कारखाना यांच्यामध्ये सामंजस्य करार करून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा कसा होईल याचे आदर्शवत मॉडेल तयार करू, असे मत मिशिगन विद्यापीठ अमेरिकेचे निवृत्त कृषी शास्त्रज्ञ डॉ. लॉरी वॉकर यांनी व्यक्त केले.
श्री दत्त कारखान्याच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची पाहणी अभ्यास दौरा तसेच एकत्रित काम करण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. चेअरमन गणपतराव पाटील यांनी क्षारपड मुक्तीच्या कामामध्ये कारखान्याच्या वतीने अभ्यासासाठी सर्व सुविधा पुरवून नवीन संशोधन करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करून सर्वांचा सत्कार करण्यात आला. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील आत्तापर्यंत झालेल्या क्षारपड मुक्तीच्या कामाचा सविस्तर आढावाही घेतला.
डॉ. लॉरी वॉकर पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या सहभागातून आणि कारखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या प्रयोगातून सिद्ध झालेल्या माहितीच्या आधारे नवीन प्रयोग आपण करू शकतो. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती कशी होईल या दृष्टीने काम करणे महत्त्वाचे आहे. यासाठी एक निश्चित ध्येय समोर ठेवून शास्त्रीय दृष्टिकोनातून काम करण्यासाठी आपण इच्छुक आहोत. गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी एकत्र येऊ शकतात. शेतकऱ्यांचे हित हे दोघांचेही ध्येय असल्यामुळे आपण एकत्र येऊन ज्ञान आणि माहितीची देवाण-घेवाण करून आगामी काळात निश्चितच वाटचाल करू. यावेळी गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल तर कारखाना सक्रिय सहभाग घेईल असे सांगून कोणत्या विचाराने, कोणत्या गोष्टीला महत्त्व देऊन हे काम पुढे नेता येईल याचा सविस्तर अभ्यास करून एकत्रित काम करण्याची ग्वाही दिली.
मिशिगन विद्यापीठ अमेरिकेच्या सहाय्यक शास्त्रज्ञ डॉ. लिसा टीमन, सोमय्या विद्याविहार विद्यापीठ मुंबईच्या सूक्ष्म जीवशास्त्र मधील संचालिका डॉ. पार्वती जे. आर., के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड ॲग्री रिसर्च समीरवाडी, जिल्हा बागलकोटचे संचालक डॉ. नंदकुमार कुंथगे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुण्याचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग, पीएचडीच्या विद्यार्थिनी इशा पोपट, कृषा शाह, अर्थतज्ञ गीतालक्ष्मी हे पाहणी दौरा आणि चर्चासत्रात उपस्थित होते.
शेडशाळ येथे महिलांनी स्थापन केलेल्या बीज बँकेला भेट देऊन बीज बँकेचे हे काम आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आणि भावी पिढीसाठी खूप मोलाचे आहे असे मत डॉ. लिसा टीमन व डॉ. वॉकर यांनी व्यक्त केले.
या अभ्यास दौऱ्यात त्यांनी मजरेवाडी, अकिवाट, शिरोळ, शेडशाळ या ठिकाणी सुरू असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी देऊन सर्व तांत्रिक बाजू समजावून घेतल्या.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, कारखान्याचे संचालक दरगू गावडे, भैय्यासो पाटील, माती परीक्षक ए. एस. पाटील, कॉन्ट्रॅक्टर कीर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे, सर्व खातेप्रमुख तसेच शेतकरी उपस्थित होते.