पाऊस सुरू झाल्याशिवाय राजापूर धरणाची बर्गे काढू नयेत -वैभव उगळे
दत्तवाड
: मागील वर्षी पाऊसमान चांगले झाले असले तरी पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्याच धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा नाही पावसाची दोन नक्षत्र कोरडी गेली आहेत अजून पंधरा दिवस पाऊस येणार नाही असे हवामान तज्ञांचे मत आहे . त्यामुळे कोयना धरणात 12.37 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तर कृष्णा नदीच्या उपनद्या असणाऱ्या वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नदीवर असणारे चांदोली राधानगरी काळमवाडी या धरणातही पाणीसाठा कमी आहे यामुळे पाणी उपसा बंदी लागू करण्यात आली आहे. ऊसासह इतर पिके वाळू लागली आहे. भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. शिरोळ तालुक्याला वरदायिनी ठरलेला राजापूर या कृष्णा नदीवरील धरणातही जेमतेमच पाणी आहे अशातच राजापूर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग केल्यास शिरोळ तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे पावसाची सुरुवात होईपर्यंत पाण्याचा विसर्ग करू नये, अशी मागणी शिवसेनेचे शिरोळ तालुकाप्रमुख वैभव उगळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
पंचगंगा नदीच्या पाण्याची परिस्थिती बिकट असताना कृष्णेच्या बँक वाटरची संजीवनी मिळाल्याने पंचगंगा नदी काठची शेती आणि पेयजल योजना टिकून राहिली आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याशिवाय राजापूर बंधाऱ्याची बर्गे काढू नयेत. बंधाऱ्याची बर्गे काढण्याबाबत पाटबंधारे विभागाने घाई करू नये अशी ही मागणी तालुका प्रमुख उगळे यांनी केली आहे.