Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

वर्तमानातील मुकाबला आता माणसाशी नसून यंत्र मानवाशी -प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे प्रतिपादन

 वर्तमानातील मुकाबला आता माणसाशी नसून यंत्र मानवाशी

-प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे प्रतिपादन


जयसिंगपूर /प्रतिनिधी:


    वर्तमानातील मुकाबला आता माणसाशी नसून यंत्र मानवाशी सुरू आहे. नवे शैक्षणिक धोरण आपल्या मानगुटीवर बसत असून त्याला विरोध हवा. शिक्षकातील शिक्षक हा समाज शिक्षक व्हावा. आपण मानसिक, सामाजिक गुलामीतून बाहेर पडणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षातून कोणी उद्योजक होत नाहीत, नोकर होतात. त्यामुळे विचारातील द्वंद्व संपवून आता एक विचार, एक दिशा ठेवून काम करावे लागेल. जगाला बदलवण्याची ताकद फक्त शिक्षकाकडे आहे, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.

     दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या वतीने प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार लिखित 'शिक्षण संवाद: तिरकस आणि चौकस' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ डॉ. सुनीलकुमार लवटे व मान्यवरांच्या हस्ते जयसिंगपूर महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात झाला. यावेळी ते बोलत होते.

    प्रा. वसंत केशव पाटील अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले, सत्य सांगणे हा आता सर्वात मोठा गुन्हा ठरत आहे. अशावेळी साहित्यिक आणि शिक्षकांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे. पर्याय शोधण्याची प्रवृत्ती वाढत असून त्यावर घाव घातला पाहिजे.

   डॉ. विजय चोरमारे, प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, डॉ. रवींद्र श्रावस्ती यांनी पुस्तकातील अनेक विषयांचा आढावा घेऊन शिक्षक, शिक्षण पद्धती आणि आगामी काळातील समस्यांवर उत्तरे शोधण्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले. अंगणवाडीपासून उच्च शिक्षणापर्यंतच्या शिक्षणाच्या प्रश्नांची चिकित्सा करत हे पुस्तक शिक्षणासंदर्भातील वेगवेगळ्या प्रश्नांसोबतच विविध विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे लेखक प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी स्पष्ट केले. 

      दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन डॉ. सुनंदा शेळके यांनी केले. आभार प्रा. शांताराम कांबळे यांनी केले. यावेळी डॉ. महावीर अक्कोळे, कार्याध्यक्ष प्रा. दि. बा. पाटील, कार्यवाह डॉ. विनोद कांबळे, प्रा. मोहन पाटील, महेश कराडकर यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते.