Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

जनतेच्या भावनेचा आदर करा, पाण्याचं राजकारण करू नकाः गणपतराव पाटील दूधगंगेतून एक थेंब ही देणार नाही : दूधगंगा काठ एकवटला

शिरोळ / प्रतिनिधी : 


काळम्मावाडी धरणापासून कृष्णेच्या संगमापर्यंत दूधगंगा नदी काठावरील शेतकरी आणि जनता एकत्र झाली असून कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजी शहराला दूधगंगेतील पाणी देणार नाही. याबाबत चर्चाही नाही आणि पाणी नाही, असा आमचा ठाम निर्धार झाला आहे. यामुळे राजकर्त्यांनी जनतेच्या भावनेचा आदर करावा. पाण्यासाठी राजकारण करू नये, निवडणुकीच्या तोंडावरच इचलकरंजीला पाणी देणाऱ्या योजना सुरू करण्यासाठी  प्रयत्न का केला जातो आहे, असा संतप्त सवाल श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केला.

      शिरोळ तालुक्यातील दूधगंगा बचाव कृती समितीच्या शिरोळ तहसीलदार कार्यालयावरील मोर्चाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, भवानीसिंग घोरपडे आदी नेतेमंडळी प्रमुख उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच इचलकरंजीला दूधगंगेतून पाणी देण्यास विरोध करताना आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

    यावेळी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, इचलकरंजी शहराला मंजूर झालेली दूधगंगा नदीवरील सुळकुड येथील अमृत दोन योजना रद्द करण्यासाठी सर्व दूधगंगा काठावरील शेतकरी एकत्र आलो आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांची शेती नष्ट होणार आहे.  दूधगंगा नदी कागल तालुक्यातील सुळकुड येथून पुढे कर्नाटकात जाते, मात्र ती पुढे कर्नाटकातून महाराष्ट्रातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड, दत्तवाड, नवे दानवाड, जुने दानवाड येथे कृष्णा नदीस मिळते. शिरोळ तालुक्यात या नदीच्या शेवटच्या भागातील दत्तवाड, घोसरवाड येथील शेतकऱ्यांना कायम पाणी मिळणार या आश्वासनामुळे काळम्मावाडी धरणातील धरणग्रस्तांना येथे जमिनी देऊन वसाहत करण्यास दिली आहे. मात्र धरणातून पाणी या शेवटच्या गावांना सध्या मिळत नाही. मागील वर्षी नऊ वेळा नदी कोरडी पडली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. तिथून पुढेही अशीच होण्याची शक्यता आहे. धरणात अपुरे पाणी असतानाच इचलकरंजी शहराला पाणी देणे शक्य नाही. यामुळे कागल तालुक्यासह सीमाभाग, शिरोळ तालुक्यातील अकरा गावांना पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे सदर योजना रद्द करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. सदरचे निवेदन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी स्वीकारल्यानंतर आंदोलकांच्या तीव्र भावना जिल्हाधिकारी व महाराष्ट्र शासनापर्यंत तातडीने पाठवणार असल्याचे सांगितले.

         दूधगंगा बचाव कृती समितीमार्फत  काढण्यात आलेल्या मोर्चाची सुरुवात शिवाजी तक्तापासून झाली. 'पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं' अशा घोषणा देत मोर्चाची सुरुवात झाली. शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा शिरोळ तहसील कार्यालयात आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले

     या सभेत बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, इचलकरंजी शहराने पंचगंगा नदी दूषित करून शिरोळ तालुक्यावर अन्याय केला आहे. हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करणार असा प्रश्न असून आम्ही दूषित पाणी का प्यायचं  व त्यांना शुद्ध पाणी आम्ही का द्यायचे? विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वारणा योजना काढली होती, ती मोडीत निघाली. आता पुन्हा पाच वर्षांनी निवडणुका लक्षात घेऊन दूधगंगा  योजना काढली आहे. ही योजना आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. आमच्या शुद्ध व हक्काच्या पाण्यासाठी आमचा लढा कायम राहणार आहे. यात कोणतेही राजकारण येणार नाही. जिल्हास्तरावरून कृती समिती स्थापन करून दूधगंगा नदीतून पाणी देण्यास दूधगंगा नदीकाठावरील गावातून तीव्र स्वरूपात विरोध होत आहे. या कृती समितीच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यातील सर्व जनता एकत्र येऊन या लढ्याला बळ देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले

       माजी आमदार उल्हास पाटील यांनी काळम्मावाडी धरणाचा व राजापूर धरणाच्या बांधकामाचा इतिहास सांगत देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कार्याचे कौतुक करून म्हणाले, जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पाणी शिरोळमधूनच कर्नाटकात जाते, पण सर्वजण आमच्यावरच अन्याय करत आहेत. हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. आमचं पाणी आम्ही कुणालाही देणार नाही. प्रसंगी आम्ही जेलही भोगायला तयार आहे. पंचगंगा अशुद्ध करणाऱ्यांनी पंचगंगेतील पाणी घ्यावे. हीच जर भाषा त्यांना कळत नसेल तर आम्हालाही वेगळी भाषा बोलता येते. कोणत्याही परिस्थितीत दूधगंगेतून इचलकरंजी शहराला पाणी देणार नाही. प्रसंगी रस्त्यावरची लढाई करू असा सज्जड इशारा त्यांनी दिला

       दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील बोलताना पुढे म्हणाले, शिरोळ तालुका हा जागृत तालुका आहे. आपल्या हक्काचे पाणी  कुणालाही देण्याचे नाही यावर आम्ही ठाम आहोत. दूधगंगा कृती समितीच्या निर्णयाबरोबर आम्ही कायम राहणार आहोत. राजकर्ते निवडणुकीच्या तोंडावरच पाणी योजनेचे राजकारण करीत आहेत. शिरोळ तालुक्यातील जनतेवर अन्याय करून पाणी कोणाला देणार असतील ते कदापिही खपवून घेतले जाणार नाही. पाच वर्षांपूर्वीही वारणेतून इचलकरंजीला पाणी देण्यासाठी योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न झाला असता वारणा काठच्या जनतेनेही लढा देऊन इचलकरंजीला पाणी देऊ दिले नाही. त्यामुळे मागचा विचार पाहता दूधगंगेतून पाणी इचलकरंजीला देण्याचे टाळावे, अन्यथा जनतेच्या द्वेषाला शासन आणि राजकर्त्यांना सामोरे जावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

        शिरोळ तालुक्यातील दत्तवाड, घोसरवाड, टाकळीवाडी, नवे दानवाड, जुने दानवाड, हेरवाड, अब्दुल लाट, शिरदवाड, शिवनाकवाडी, सीमा भागातील बोरगाव, मलिकवाड, नंनदी, सदलगा, वडगोल, एकसंबा, कल्लोळ, हिरेकुडी तर कागल तालुक्यातील सुळकुड, सांगाव, कागल, बिद्री या गावातून शेतकरी मोर्चाला उपस्थित होते .

      यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील, सुळकुडचे अमोल शिवई, सांगावचे मनोज कोडोले, बोरगावचे अण्णासाहेब हावले, मलिकवाडचे बाळासाहेब पाटील, पुंडलिक खोत, नंनदीचे संपतराव थोरात, मल्लू हवलदार, आंदोलन अंकुशचे धनाजी चूडमुंगे, दीपक पाटील, दानवडचे सरपंच डॉ. सी. डी. पाटील, कृती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, सूर्यकांत चौगुले, बाबुराव पोवार, सुरेश पाटील, विवेक चौगुले, युवराज घोरपडे, राजू पाटील, उपसरपंच मनीषा चौगुले, यांच्यासह नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री गुरुदत्त शुगर्सचे संचालक बबनराव चौगुले यांनी आभार मानले. सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले.

 इचलकरंजी शहराला पाणी देण्यासाठी सुरू असलेल्या अमृत योजनेला सुळकुड मधून पाणी द्यावे असे सांगणाऱ्या सांगली जिल्ह्यातील आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा या मोर्चात निषेध करण्यात आला. त्यांच्या निषेधाचा ठराव शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती भवानीसिंग घोरपडे यांनी मांडला.