सांगली चा ऐतिहासिक संस्थानकालीन गणेशोत्सव.
दत्तवाड : सौ मंदा देशपांडे
ऐतिहासिक संस्थानकालीन गणेशोत्सवाची परंपरा आजही मोठ्या उत्साहात संपन्न होत असते. यंदाच्या वर्षी ही विविध उपक्रमांनी व आकर्षक अशा विद्युत माळांनी, फुलांच्या व रांगोळीच्या सजावटीने संपन्न झाला.
सांगलीचे संस्थापक राजे चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी सन १८०१ मध्ये गणेशदुर्ग राजवाडा व गणपती मंदिर बांधण्यास सुरुवात केली. पेशवेकालीन (इ.स.१७०० )साम्राज्याच्या चार आधारस्तंभापैकी सांगलीचे पटवर्धन घराणे होते. चिंतामणराव पहिले हे वयाच्या १७ व्या वर्षी हैदर अली व टिपू सुलतान यांच्याशी लढले होते.ते पायदळांशिवाय १०,००० घोडदळाचे प्रमुख सेनापती ही होते. संस्थानातील मुस्लीम समाजातील लोकांना न्यायाची व सन्मानाची वागणूक दिली. मशिदीसाठी जागा नेमून दिली. राजधानी सांगली जवळील नांद्रे येथील उरुसात सहभागी होत असत. श्री गणपती पंचायतन मंदिरासमोरील भागात संस्कृत भाषेबरोबरच उर्दू भाषेतही नावे लिहिली आहेत.
ज्याप्रमाणे भरताने प्रभू रामचंद्रांच्या नावे राज्यकारभार पाहिला तसाच राज्यकारभार गजाननाच्या नावाने चालवित असत.योद्धे,कुशल प्रशासक, शैक्षणिक व सामाजिक कार्याची दूरदृष्टी ठेवणारे माहिती तंत्रज्ञानाचे जनकही होते.स्वातंत्र्योत्तर काळात पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले गेले.
यंदाच्या वर्षी दि.१९ सप्टेंबर रोजी श्रींची स्थापना समारंभ, दरबार पानसुपारी, श्रीमंत राजेसाहेब यांचे हस्ते श्रींची महापूजा करण्यात आली. दि. २० सप्टेंबर रोजी 'अनुभूती' हा सुप्रसिध्द गायक ह्रषिकेश रानडे व राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रविंद्र यांनी सादर केली. दि. २१ सप्टेंबर रोजी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या विषयी अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान झाले. दि.२२ सप्टेंबर रोजी 'गणाधीश ' हा सुप्रसिध्द गायिका देवकी पंडित यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तर दि. २३ सप्टेंबर रोजी श्रींचे विसर्जन सोहळा(रथोत्सव ) दरबार व पानसुपारी,राजवाडा ते गणपती मंदिर ते सरकारी घाट या मार्गावर विसर्जन सोहळा पार पडेल.
अशा प्रकारे श्री गणपती पंचायतन संस्थान सांगलीचा गणेशोत्सव सोहळा दरवर्षी मोठया उत्साहात संपन्न होतो. लाखो भाविक गणरायाचे दर्शन घेत असतात.