Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या प्रेमकहाणी वरील 'आणि चांदणे उन्हात हसले' या कादंबरीचे प्रकाशन

 डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या प्रेमकहाणी वरील 'आणि चांदणे उन्हात हसले' या कादंबरीचे प्रकाशन



शिरोळ/प्रतिनिधी:

    शिरोळ येथील शब्दगंध साहित्य परिषद तर्फे श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती नवव्या साहित्य संमेलनामध्ये संमेलनाध्यक्ष, ख्यातनाम कवी रामदास फुटाणे आणि मान्यवरांच्या हस्ते लेखिका डॉ. राजश्री पाटील यांच्या 'आणि चांदणे उन्हात हसले' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. 

     डॉ. प्रकाश आमटे आणि मंदा आमटे यांचे प्रेम आणि सहजीवन प्रथमच कादंबरीच्या रूपाने साहित्य प्रेमींसमोर आले आहे. डॉ. राजश्री पाटील यांनी आमटे दाम्पत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आणि त्यांच्याशी चर्चा करून एक वेगळी प्रेमकहाणी साहित्यात आणण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. प्रकाशन क्षेत्रातील नावाजलेल्या ग्रंथाली प्रकाशनने पुस्तक प्रकाशनाची जबाबदारी पार पाडली आहे.

      आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. राजश्री पाटील म्हणाल्या, डॉक्टर प्रकाश आणि मंदा आमटे यांच्या लोकबिरादरी या हेमलकासा येथील  प्रकल्पाच्या पन्नासाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या दाम्पत्यांना पुस्तक भेट दिले. जेष्ठ साहित्यीक लक्ष्मीकांत देशमुख व इतर अनेक मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली तिथे प्रकाशन झाले होते. परंतु तेव्हाच प्रथम आवृत्ती संपली आणि दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने तसेच इकडच्या साहित्यिकांनाही त्याची माहिती व्हावी म्हणून पुनश्च पुस्तक प्रकाशन या संमेलनात करत आहे. प्रकाश भाऊंच्या बरोबर मंदा आमटे यांचा सुद्धा कार्यात खूप मोठा वाटा आहे. त्यांचे व्यक्तिमत्व, कार्य सर्वांसमोर यावे ही प्रांजल इच्छा होती. त्यांची प्रेम कहाणी खूप वेगळी अशी आहे. त्यांचा विवाह, त्यांचा हनिमून, त्यांची एक्सटेंडेड फॅमिली (प्राण्यांचे गोकुळ ) आणि त्यांचे डोंगराएवढे आदिवासींच्या साठीचे कार्य करतानाचे समर्पण  आणि हळव्या प्रसंगात एकमेकांच्या साथीने केलेली वाटचाल किंवा दीनानाथ मध्ये ऍडमिट असताना कॅन्सर झाल्याचे समजल्यानंतरचे त्यांचे भाव विश्व आदी अनेक नवीन गोष्टी या कादंबरीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण अनेक प्रेम कहाण्या पाहतो, वाचतो, ऐकतो, ज्या की फक्त एकमेकांसाठी आत्म सुखासाठी असतात. परंतु ही प्रेम कहाणी 'स्व 'च्या पलीकडे जाऊन समाजाभिमुख होणारी आहे. एक खूप मोठा सामाजिक आयाम असणारी आहे. नवीन पिढी पुढे याचा आदर्श असावा आणि यांच्यासारखं संपूर्ण मार्गक्रमण नसलं तरी एक दोन पावलं जरी आपण उचलली तरी या लेखन प्रपंचाचा उद्देश सफल होईल असेही त्या म्हणाल्या.

     प्रारंभी संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष रामदास फुटाणे यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी आणि संजय सुतार तर आभार शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार यांनी मानले.

    माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री दत्त कारखाना चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. मोहन पाटील, समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी, महाराष्ट्र केसरी महिला कुस्तीपटू कु. अमृता पुजारी (शिरोळ), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू, माजी आम. उल्हासदादा पाटील, श्री दत्तचे व्हा. चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक अनिलराव यादव, रघुनाथ पाटील, इंद्रजीत पाटील, रणजित कदम, शेखर पाटील, संजय पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, शिरोळ मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, शब्दगंध साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. दगडू माने, सचिव शंतनू यादव, पृथ्वीराजसिंह यादव, यादव कुटुंबीय, विविध संस्थांचे पदाधिकारी, साहित्य प्रेमी उपस्थित होते.