Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

देसाई इंगळी मधील शेतकऱ्यांनी जमीन क्षारपड मुक्तीच्या योजनेत सहभागी व्हावे उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचे आवाहन

 

देसाई इंगळी मधील शेतकऱ्यांनी जमीन क्षारपड मुक्तीच्या योजनेत सहभागी व्हावे

 उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचे आवाहन


 शिरोळ/ प्रतिनिधी:

     देसाई इंगळी आणि परिसरामध्ये सुमारे 2000 एकरा पेक्षा जास्त जमीन क्षारपड युक्त झाली आहे. ही जमीन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या क्षारपडमुक्तीच्या 'श्री दत्त पॅटर्न' योजनेत सहभागी होऊन आपली जमीन सुधारून घ्यावी. या कामी दत्त कारखान्याकडून सर्व ती मदत केली जाईल. आत्ताच क्षारपड मुक्तीचे काम केले नाही तर भविष्यात आपल्या पिढीचे जीवन उध्वस्त होईल. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संस्था स्थापन करून लवकरात लवकर ही योजना कृतीत आणावी, असे आवाहन श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.

        देसाई इंगळी (कर्नाटक) येथे आयोजित ऊस शेती चर्चासत्रात ते बोलत होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी अशोक जोशी होते.

    गणपतराव पाटील म्हणाले, आतापर्यंत 24 गावांमध्ये आठ हजार चारशे एकरावर क्षारपड मुक्तीचे काम झाले असून अनेक नवी गावे या योजनेत स्वखर्चाने सहभागी होत आहेत. या योजनेचा खर्च एकरी सव्वा लाखापर्यंत येत असून ज्या शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जातो. अवघ्या दोन-तीन वर्षांमध्ये हे कर्ज शेतकऱ्यांची जमीन सुपीक झाल्यानंतर फिटू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रितपणे संस्था स्थापन करून क्षारपड मुक्तीचे काम जलद गतीने करावे. कारखाना पातळीवरून यासाठी सर्व ती मदत करण्यास आपण तयार आहोत.

      व्ही. एस. आय. पुण्याचे माजी शास्त्रज्ञ डॉ. सुरेश माने पाटील बोलताना म्हणाले, सच्छिद्र निचरा प्रणाली करून जमीन क्षारपड मुक्त करण्याचे काम करणे ही काळाची गरज असून या प्रणाली शिवाय सध्या पर्याय नाही. वर्षभरातून एकदा जमिनीचे सपाटीकरण, सबसॉयलर मारणे आणि सच्छिद्र प्रणाली करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ऊस शेती करताना सक्षम रोपनिर्मिती करण्यासाठी सुपर केन नर्सरीचे तंत्रज्ञान आत्मसात करावे. सध्याचे युग हे ड्रीपच्या माध्यमातून थेंबाथेंबाने पाणी देण्याचे आणि ग्रॅमने खते देण्याचे आहे, त्यामुळे वर्षभराच्या कालावधीमध्ये रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय खताचे संपूर्ण नियोजन करून शेती करावी. दोन सरीमध्ये साडेचार फुटापेक्षा जास्त अंतर ठेवल्यास मशिनरीने काम करणे सोयीचे होईल त्याच पद्धतीने हरभरासारखे आंतरपीक घेतल्यास एक ते सव्वा लाख रुपये पर्यंतचे उत्पादनही निघून जमिनीचाही पोत सुधारतो असे सांगून त्यांनी लागणी पासून काढणीपर्यंतचे ऊस पिकाचे संपूर्ण नियोजन, खोडवी नियोजन याची अभ्यासपूर्ण माहिती दिली.

     प्रारंभी स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन झाले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. सुरेश माने पाटील व गणपतराव पाटील यांनी उत्तरे दिली. स्वागत राजाराम माने यांनी केले. सूत्रसंचालन अजित खाडे यांनी केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अरुणकुमार देसाई, संचालक इंद्रजीत पाटील, अमर यादव, महेंद्र बागी, माती परीक्षण विभाग प्रमुख ए. एस. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, अण्णासाहेब चौगुले, चंद्रकांत लंगोटे, बाजीराव माने, गणपती धनवाडे, प्रकाश मौर्य, अप्पासाहेब मिरजे, अमोल शेट्टी, अण्णासाहेब सरडे, रमेश मुरचिटे, संतोष चिंचणे, संजू गुरव, राजू पवार, श्रीकांत शेळके, मोहन लोकरे यांच्यासह परिसरातील शेतकरी, शेती अधिकारी, मदतनीस, कर्मचारी उपस्थित होते.