भवतालची माणसं' म्हणजे सामान्य माणसांच्या दुःखाचा दस्तऐवज रिंगणकार कृष्णात खोत यांचे प्रतिपादन जयसिंगपूर येथे सतीश कामत यांच्या 'भवतालची माणसं' पुस्तकाचे प्रकाशन
जयसिंगपूर/प्रतिनिधी:
लेखकाने प्रथम माणूस वाचायला शिकले पाहिजे. माती इमान राखत माणूस ओळखायला शिकले पाहिजे. चांगले निरीक्षण आणि उत्तम समाजभान यातूनच सकस लेखक जन्माला येतो, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध लेखक कृष्णात खोत यांनी केले.
सतीश कामत लिखित आणि शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर प्रकाशित 'भवतालची माणसं' या व्यक्तीचित्रण संग्रहाचा प्रकाशन सोहळा जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडला. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जयसिंगपूर- शिरोळ आणि मराठी विभाग, जयसिंगपूर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जयसिंगपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. महावीर अक्कोळे हे अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना कृष्णात खोत पुढे म्हणाले की, 'भवतालची माणसं' ही खऱ्या अर्थाने सामान्य लोकांची घटनाचित्रे आहेत. लेखक सतीश कामत यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून ही घटनाचित्रे आकाराला आली आहेत. कुटुंब, नातेसंबंध, समाज संकेत, स्वप्रतिमा यांचा प्रत्यय कामत यांच्या लेखनात जागोजागी येतो. कोणताही आड पडदा न ठेवता थेट अनुभवाचे कथन कामत करतात. लेखक या भवतालच्या माणसांशी संवाद करतो. ही माणसं पावलोपावली संघर्ष करणारी आहेत. धडपडणारी आहेत. प्रसंगी हरणारी आहेत. लेखक अशा पराजित माणसाची व्यथा आणि कथा मांडतो. सध्याचा काळ हा मोठा कठीण आहे. मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अपराधी भाव दिसतो. या उलट बडे उद्योगपती देशाला उघड उघड लुटत आहेत. देश सोडून पळून जात आहे. आणि काहीच गुन्हा नसताना शेतकरी मात्र स्वतःला संपवत आहे. हे दुःख लेखकाला असह्य होते. म्हणूनच तो भवतालातली नियतीशरण, दुःखी कष्टी माणसं तुमच्यासमोर उभी करतो. एका अर्थी 'भवतालची माणसं' म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसांचा इतिहास आहे, असे विचार कृष्णात खोत यांनी मांडले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल कृष्णात खोत यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ ग्रामीण लेखक डॉ. मोहन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी 'भवतालची माणसं' या व्यक्तिचित्रात मोठ्या कादंबरीची बीजे दडल्याचे सांगितले. या पुस्तकातून जिवंत माणसांचे दर्शन घडते. हे लेखन कल्पकता आणि अभिनवेशरहित असल्याने वाचनीयता हा गुण त्यात दडलेला आहे. त्यामुळे वेगळ्या अंगाने केलेल्या लेखनाची नोंद मराठी साहित्यात घेतली जाईल, असा आशावाद डॉ. मोहन पाटील यांनी व्यक्त केला.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. महावीर अक्कोळे म्हणाले, 'सतीश कामत यांनी आपल्या लेखनातून भवतालाची नोंद घेतली आहे. व्यक्तिदर्शन घडवताना अनेक सामाजिक प्रश्नांची दखलही ते घेतात. वांग्मयीन मूल्याबरोबर समाज मूल्यांचे दर्शन या पुस्तकातून होते. त्यामुळे सतीश कामत यांचे लेखक म्हणून भवितव्य उज्ज्वल आहे.
या प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी केले. तर डॉ. सुभाष पाटील यांनी पाहुण्यांची ओळख व सूत्रसंचालन केले. आभारप्रदर्शन मसाप शाखा जयसिंगपूरचे सचिव संजय सुतार यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, डॉ. नितीश सावंत, पद्माकर पाटील, रावसाहेब पुजारी, पोलिस पाटील डॉ. सतीश कांबळे, कोंडिग्रे सरपंच बाळासाहेब हांडे यांच्यासह जयसिंगपूर व परिसरातील रसिक, वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.