जेडी न्यूज
कोल्हापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.27) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत हराळे, सध्या राहणार शिरोळ, मुळगाव भिलवडी, ता. पलूस जि. सांगली, नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता संकेत हनुमंत हंगरगेकर, सध्या रा.जयसिंगपूर मुळगाव उस्मानाबाद जिल्हा, क्लार्क सचीन तुकाराम सावंत रा. सावंत गल्ली, शिरोळ. खाजगी व्यक्ती अमित तानाजी संकपाळ रा. बाल शिवाजी मंडळ जवळ, शिरोळ. यापैकी नगरपरिषदेकडे काम करणाऱ्या तिघांनी वेगवेगळ्या पध्दतीने 1 लाख आणि 75 हजार रुपये अशा दोन पद्धतीची लाच मागून ती खाजगी व्यक्तिमार्फत स्वीकारताना रंगेहात पकडले.या कारवाईनंतर शिरोळ शहरात एकच खळबळ उडाली.अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी धास्तीने गाशा गुंडाळून घर गाठले.दुपारनंतर सर्वच ठिकाणी शुकशुकाट पसरला होता.
यातील तक्रारदार याने शिरोळ ते नंदीवाले वसाहत रोडवर बांधकाम करण्याच्या उद्देशाने बांधकाम परवान्यासाठी फाईल तयार करून नगरपरिषदेकडे सादर केली होती. सदरची फाईल मंजूर करून पुढे पाठवण्यासाठी संशयीत आरोपी संकेत हंगरगेकर व सचीन सावंत यांनी पहिल्यांदा तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.त्यानंतर संशयीत आरोपी मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांनी ही फाईल मंजूर करण्यासाठी 75 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर संशयीत आरोपी हराळे व हंगरगेकर त्यांनी संशयित आरोपी सचिन सावंत याला सदरची लाच स्वीकारायला सांगितली. त्यानंतर संशयित सावंत यांनी ही लाच संशयित आरोपी खाजगी व्यक्ती अमित संकपाळ यांना स्वीकारण्यास सांगितली. संशयित संकपाळ यांनी ही लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहात पकडून ताब्यात घेतले.
पथकाने चारही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन विश्राम गृहावर आणून त्यांची लाच मागणी संदर्भात सखोल चौकशी केली. संशयित्यांना रंगेहात पकडण्यापूर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुपारी एक वाजल्यापासून नगरपरिषदेच्या अवती भोवती वेगवेगळ्या ठिकाणावरून सापळा रचून नजर ठेवली होती.दरम्यान, पथकाने एका हॉटेलमध्ये सुमारे दोन तास ठाण मांडली होती. कोणालाही,कसलाही संशय येऊ नये, याची काळजी घेण्यात आली होती. या कारवाईनंतर शहरात बहोत खुशी, कही गम ! अशी स्थिती जानवत होती.
पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पीएसआय संजीव बबरगेकर पो.कॉ. विकास माने, पो.कॉ. मयूर देसाई पो.कॉ.रुपेश माने, पो.कॉ. विष्णू गुरव यांनी सापळा रचून कारवाई यशस्वी केली.