दिव्यांगांना मदत करण्यासाठी कोठेही कमी पडणार नाही श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची ग्वाही
दिव्यांगांना मदत करण्यासाठी कोठेही कमी पडणार नाही
श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची ग्वाही
शिरोळ/प्रतिनिधी :डॉ. नसीमा हुरजूक यांनी दिव्यांगांना नवी ताकद आणि नवी दृष्टी दिली आहे. त्या मार्गावर काम करण्याची उर्मीही दिलेली आहे. मन बळकट ठेवून काम करण्याची दृष्टी आपण सर्वांनीच ठेवली पाहिजे. तुमचे आत्मबल खंबीर ठेवा. दिव्यांगांना मदत करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत सातत्याने राहून कोठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.
साहस डीसएबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने साहस कृत्रिम साधन वाटपाचा कार्यक्रम श्री दत्त शेतकरी साखर कारखाना कार्यस्थळावर पार पडला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई होते.
उद्योगपती विनोद घोडावत म्हणाले, दिव्यांगांच्या कामाला पुढे नेण्याची गरज असून समाजातील सर्व घटकांनी आपापल्या परीने यामध्ये सहभाग उचलावा. नसीमा हुरजूक दीदी जे जे सांगतील त्या पद्धतीने मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. सौ. सुधा अजित माळी, पत्रकार दगडू माने, डॉ. सुरेश पाटील, सुरेश शिपुरकर यांनी मनोगतातून दिव्यांगांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन संस्थेला शुभेच्छा दिल्या.
सौ. वृषाली शिंदे यांनी संस्थेची प्रार्थना सांगितली. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या प्रमुख डॉ. नसीमा हुरजूक यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या एकंदर कामकाजाचा आढावा घेतला. दिव्यांगाना बॅटरी ऑपरेटेड ट्रायसिकल, व्हीलचेअर, शिलाई मशीन, हॉस्पिटल बेड आधी कृत्रिम साधनांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेला मदत केलेल्या डॉ. पद्मराज पाटील, डॉ. ज्योती मंगसुळे, डॉ. नीलम पाटील बिरनाळे, दर्शन पाटील, सुनंदा चुडाप्पा, शुभम पलसे, महादेव माळी, पुष्पा माणगावे, सुमित माणगावे, भरत जाधव, डॉ. अनुजा करमरकर आदींचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राहुल ढाले यांनी केले तर आभार साताराम पाटील यांनी मानले. 'गगनाला पंख नवे' ही चित्रफीत सर्वांना दाखवण्यात आली. यावेळी मधुताई पाटील, सचिन पिंपळे, दीपक कांबळे, संगीता कुंभार, उज्वला काळे, पार्वती नायडू, विलास माने, अंबादास नानिवडेकर, प्रमोद चौगुले, विशाल पाटील, संजय सुतार यांच्यासह साहस संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, कोल्हापूर जिल्हा आणि परिसरातील दिव्यांग बंधू, भगिनी उपस्थित होते.