एक दिवस विना दप्तराची अनोखी शाळा
एक दिवस विना दप्तराची अनोखी शाळा
नांदणी :आठवड्यातून एक दिवस विना दप्तर शाळा या अभिनव उपक्रमाची सुरुवात कै.शहा तुळजाराम नागरदास कन्या विद्या मंदिर नांदणी या शाळेने सुरुवात केली. शिक्षण हजारो विद्यार्थ्यांमधून सर्वोत्तम कोण हे शोधण्यासाठी नसून प्रत्येक विद्यार्थ्यात सर्वोत्तम असे काय आहे ? याची जाणीव करून देण्यासाठी आहे . शाळेने या वर्षी आठवड्यातून एक दिवस विना दप्तर शाळा,पुरक व पोषक आहार , क्रिटीकल थिकिंग , भाषा गणित आनंदाने शिकू या वेगळ्या उपक्रमाची सुरुवात केली.
शाळेने या वर्षापासून आठवड्यातील प्रत्येक शनिवारी शालेय पुस्तके न आणता निसर्ग सहल, वेगवेगळ्या संस्थांना भेटी , डेअरी व दुकाने पाहणे , वेगवेगळे उद्योगांना भेटी देणे , वाचनालयात जाणे , ग्रामपंचायत व पाणीपुरवठा ठिकाण भेट देणे , गोष्ट व कविता लेखन तयारी, पाणवठे व नैसर्गिक शेतांना भेटी देणे , मुलाखती आजी आजोबा, वेगवेगळ्या वस्तू बनवणे या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुलींना शालेय शिक्षणाबरोबर यातून काही शिकता येईल, अनुभव घेता येईल . वेगवेगळ्या विषयात आवड निर्माण व्हावी. निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावे . या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे.
जागतिक भरड धान्य वर्ष सुरू आहे.शालेय पोषण आहारा बरोबर थोडे भरड धान्य , पुरक व पोषक आहाराची आवश्यकता आहे.
फास्ट फूड व जंक फूडच्या काळात शरीराला पोषक आहार मिळावा म्हणून रोज वेगवेगळे पदार्थ खाणे जे तळलेले नाहीत, भाजलेले नाहीत, उकडलेले नाहीत, शिजवलेले नाहीत . प्रत्येक दिवशी यातील स्वस्त व सहज उपलब्ध होणारे कडधान्ये, पालेभाज्या, फळभाज्या,गुळ शेंगा, बाजरी,नाचणी, वरी , सुकामेवा इत्यादी मुलींनी आणावे. जो शरीरासाठी पौष्टिक आहार असेल .जो साथीच्या अनेक आजारांना दूर ठेवील.
क्रिटीकल थिकिंग याचा उद्देश मुलींच्या समोर अनेक समस्या, आव्हानं, प्रश्न , अडचणी निर्माण होत असतात . या वर सारासार विचार करून, विवेकबुद्धी वापरून मार्ग काढावा . वेगवेगळ्या पध्दतीने विचार करण्याची सवय लागावी ,
सकारात्मक विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी . या उद्देशाने वेगवेगळ्या घटकांवर आधारित पहिल्या सत्रात दोन व दुसऱ्या सत्रात दोन अशा चार कृतीयुक्त चाचण्या घेण्यात येणार आहेत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भाषा व गणित विषयातील मुलभूत संकल्पना स्पष्ट व्हाव्यात , स्तरानुसार अध्ययन निषप्ती साध्य करण्यासाठी मुली आठवड्यातील दोन दिवस भाषा व गणित लॅब मध्ये इयत्तेनुसार गटागटात काम करतील , लॅब मधील सर्व काम कृती युक्त असणार आहे . ज्यामुळे शिकण्यातील आनंद वाढेल व कृती करत शिकल्यामुळे चांगले स्मरण होईल.
या लॅब मध्ये शिक्षकांची भूमिका मार्गदर्शकाची असेल. सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध असेल . पी एम श्री मध्ये निवड झालेल्या शाळेत कराटे,रोपमल्लखांब, बुध्दिबळ, लाठीकाठी काठी, संगीत, चित्रकला, संगणक शिक्षण , स्वानंदी शिक्षण, संविधान शिक्षण या सारखे अनेक उपक्रम सुरू आहेत.