दत्त कारखान्याच्या क्षारपडमुक्त जमिनीच्या पॅटर्नला कॉपीराईट प्राप्त : गणपतराव पाटील कृत्रिम सच्छिद्र निचरा प्रणालीमुळे उत्पादनात वाढ शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य
शिरोळ : प्रतिनिधी :
नापीक आणि क्षारपड जमीन क्षार मुक्त व पिकावर करून त्यातून उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी उपयुक्त ठरत असलेला आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कृत्रिम सच्छिद्र निचरा प्रणाली व बंदिस्त मुख्य पाईपलाईन या क्षार मुक्ती प्रकल्पाला केंद्र शासनाचे कॉपीराईट (पेटंट)अधिकार प्राप्त झाले आहेत याचा आम्हाला अभिमान आहे देशातील शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या नापिक जमिनी सुपीक करण्यासाठी पुढाकार घ्यावा त्यास आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील राज्य व केंद्र शासनाने ही शेतकऱ्यांच्या जमिनी क्षारमुक्त करण्यासाठी अनुदान देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याची माहिती श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उद्यान पंडित गणपतराव पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की
श्री. दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील क्षारपड जमिनींमुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत होते. ही बाब ध्यानात घेवून कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली जमिनी क्षारमुक्त होवून उत्पादनक्षम होण्याच्या दृष्टीने क्षारमुक्त जमिन प्रकल्प गेल्या सहा वर्षांपासून हाती घेतला आहे. त्या-त्या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येवून सहकारी संस्थांच्या स्थापना कराव्यात, जमिनी क्षारमुक्त होण्याकरीता कृत्रिम सच्छिद्र निचरा प्रणाली व बंदीस्त मुख्य पाईपलाईन या तंत्राचा वापर करून क्षारमुक्तीचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प शेतकरी कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली स्व-खर्चातून राबवित आहेत. तसेच या प्रकल्पास डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर-उदगाव सहकारी बँक, विरशैव सहकारी बँक इ. बँकांकडून अर्थसहाय्य प्राप्त होत आहे. सदरचा प्रकल्प शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहे यामुळे आज अखेर कारखाना कार्यक्षेत्रातील २३ गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत असून याद्वारे ८००० एकर इतकी जमिन क्षारमुक्त होणार आहे. या प्रकल्पांतर्गत १९२ कि.मी. मुख्य बंदीस्त पाईप लाईनचे काम पुर्ण झाले आहे व ३८०० एकर इतक्या जमिनीमध्ये कृत्रिम सच्छिद्र निचरा प्रणालीचे काम पुर्णत्त्वास जावून सदरच्या जमिनी पिकावू झाल्या आहेत. आणि या जमिनीतून शेतकरी वेगवेगळी पीक घेऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त करत आहेत त्यामुळे हा क्षारमुक्त जमीन प्रकल्प देशभरात पथदर्शक व दत्त पॅटर्न म्हणून नावारूपास येत आहे.
आपल्या परीसरातील जमिनींचे स्वरूप व त्यानुषंगाने मुख्य बंदिस्त पाईपलाईन व सच्छिद्र निचरा प्रणाली करीता वापरावे लागणारे निकष प्रयोग करून या दत्त पॅटर्न अंतर्गत विकसीत करण्यात आले आहेत. या मुख्य बंदिस्त पाईपलाईन व सच्छिद्र निचरा प्रणालीच्या निकषाचे अतिशय चांगले परिणाम मिळाले आहेत. यामुळे जमिनीतील जादा पाणी व क्षार लवकर निचरा होवून जमिनी कमी कालावधीत पिकावू होत आहेत. याचा फायदा ज्या शेतकऱ्यांनी सदर प्रणालीचा वापर केला आहे, त्यांना दिसून येत आहे.. त्यामुळेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कल या मुख्य बंदिस्त पाईपलाईन व सच्छिद्र निचरा प्रणालीद्वारे आपली जमीन क्षारमुक्त करण्याकडे दिसून येत आहे. आपल्या कारखाना कार्यक्षेत्राबरोबरच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागासह सांगली जिल्ह्यातीलही दोन गावात क्षारमुक्त जमीन प्रकल्पाचे काम सद्या सुरू आहे. या मुख्य बंदिस्त पाईपलाईन व सच्छिद्र निचरा प्रणालीस केंद्रिय क्षार जमीनी संशोधन केंद्र कर्नाल, हरीयाना या संस्थेने मान्यता दिली आहे. या सर्व बाबींचा विचार करून दत्त पॅटर्नच्या या मुख्य बंदिस्त पाईपलाईन व सच्छिद्र निचरा प्रणालीस केंद्र शासनाचे कॉपी राईटचे अधिकार प्राप्त झाले आहेत. या कॉपी राईटच्या अधिकारामुळे सच्छिद्र निचरा प्रणालीच्या निकषांचे संवर्धन करता येणार आहे. तसेच याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चितपणे होणार आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनी सुपीक करावयाच्या आहेत त्यांनी या मुख्य बंदिस्त पाईप व सच्छिद्र निचरा प्रणाली हा प्रकल्प राबवावा यासाठी शेतकऱ्यांना आमचे सहकार्य राहील असे त्यांनी सांगितले
यावेळी कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा सचिव अशोकराव शिंदे जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादासो काळे जयसिंगपूर चे उद्योगपती अशोकराव कोळेकर मुंबईचे उद्योगपती मयूरभाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते