श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने आलास येथे शेतकरी मेळावा उत्साहात
शिरोळ/ प्रतिनिधी:
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ब्रह्मनाथ मंदिर आलास येथे शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच भूपाल उपाध्ये होते, तर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्ही.एस.आय. पुण्याच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रिती देशमुख यांनी जमिनीची सुपीकता, उत्पादकता व ऊस उत्पादन वाढीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्व यावेळी विषद केले. रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय खतांचा एकत्रित आणि योग्य वापर शेतकऱ्यांनी केल्यास उत्पादनामध्ये चांगली वाढ होऊ शकते. ऊस पिक वाढ अवस्थेच्या प्रमाणे सर्व खतांची निवड आणि वेळेप्रमाणे खत देणे आवश्यक असल्याचे सांगून सेंद्रिय कर्ब, पाचट, सूक्ष्म अन्नद्रव्ये, ठिबक सिंचन योजना, माती परीक्षण, तणनाशके आदींच्या बाबतीत विस्तृतपणे माहिती दिली.
तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ आर. जी. यादव यांनी ऊस पिकावरील रोग व कीड आणि त्यावरील उपाय या विषयावर बोलताना शेतीमधील तंत्रज्ञान हे वाईट नसून त्याचा चुकीचा वापर धोकादायक बनला असल्याचे सांगितले. निसर्गातील बदलामुळे पिकावर परिणाम होत असून लोकरी मावा, हुमणी नियंत्रण, बुरशी नियंत्रण तसेच रोग व किडींचे नियंत्रण आदी विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. एकात्मिक आणि सामुदायिक रीतीने शेतीचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
चेअरमन गणपतराव पाटील यांनी सुपर केन नर्सरी, सेंद्रिय कर्ब वाढीचे फायदे, पाणी, खत, वेळेचे नियोजन याविषयी माहिती सांगून कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.
प्रारंभी स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी प्रास्ताविकामध्ये क्षारपड विकास योजना चळवळ भूषणावह असून यामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा आणि खर्चात बचत करून जमीन शाश्वत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. सूत्रसंचालन व स्वागत मुनाफ जमादार यांनी केले तर आभार मुजम्मिल पठाण यांनी मानले. समाजभूषण आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार मिळाल्याबद्दल गणपतराव पाटील यांचा विविध संस्था आणि मान्यवरांनी सत्कार केला. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मान्यवरांनी उत्तरे दिली. यावेळी माती परीक्षण विभागप्रमुख ए. एस. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, नासर पठाण, बापूसो बोरगावे, राजू पाटील, साताप्पा गावडे, जीवंधर उपाध्ये, शंकर राजमाने, रावसाहेब पाटील, सुभाष शहापुरे, मल्लाप्पा ऐनापुरे, मोहन ककमरे, अशोक पाटील, नंजाप्पा भेंडवडे, नोहिरापाशा पाटील, निजगोंडा बोरगावे, चाँदपाशा पाटील, असलम मखमला, अजित दानोळे, गोविंद कोल्हापुरे, आजमपाशा पाटील, अन्वरपाशा पाटील, डॉ. बोरगावे यांच्यासह शेतकरी व कारखान्याचे शेती अधिकारी, मदतनीस उपस्थित होते.