आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार : जयंत पाटील शिरोळ तालुक्यात राष्ट्रवादीची आढाव बैठक
शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. येणार्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यात येणार आहेत. शिरोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी पाठबळ देऊन गावागावात पक्ष बळकट करावा. त्याचबरोबर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण? त्याचा निर्णय शरद पवार घेतील. त्यामुळे आपण सर्वांनी कामाला लागावे असे अहवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.
शिरोळ येथे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून चर्चा केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील बोलत होते. प्रथम स्वागत राष्ट्रवादीचे शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांनी करून तालुक्यात पक्ष वाढीबाबत सुरू असलेल्या बाबीचा आढावा दिला. त्यानंतर औरवाड (ता.शिरोळ) येथे दर्ग्याचा पायाभरणी शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सांगलीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, अबीद पटेल, असरफ पटेल उपस्थित होते.
या आढावा बैठकीवेळी मदन कांरडे, जिल्हा युवाध्यक्ष रोहित पाटील, बी.जी.माने, रावसाहेब भिलवडे, राजगोंडा पाटील, चंद्रशेखर मगदूम, किरण कोळी, पृथ्वीराज देसाई, अजुम कुडचे, अशोक कमते, डी.पी.कदम, विक्रम पाटील, श्रेणीक कोगनोळे, सचिन शिरगावे यांनी शिरोळ तालुक्यातील राजकीय बाबींची माहिती दिली.