गौरवाडसह परिसरात पांरपारिक पद्धतीने उत्साहात गौरीचे आगमन.
गौरवाड (प्रतिनिधी ):-
गौरवाड सह परिसरातील औरवाड,आलास,बुबनाळ,कवठेगुलंद,शेडशाळ,गणेशवाडी मध्ये आज उत्साहात गौरींचे आवाहन करण्यात आले .
प्रत्येक घरातील सुवासिनी स्त्रिया पारंपरिक पद्धतीने नटून- सजून गौरीचे पूजन केले.
आज प्रत्येक घरासमोर रंगीबिरंगी रांगोळी काढण्यात आली होती.गौरी मध्ये चाफ्याची पाने ,मक्याचा तुरा ,विविध फुले- झाडांची डहाळे, रंगीबिरंगी फुले आदी घेऊन सुवासिनी स्त्रिया नटून-थटून गाणी म्हणत नदी -विहिरीवर गौरी पुजण्यासाठी गेल्या. नदीतील पाच सात खडे घेऊन, गौरीला पाण्यात थोडेसे बुडवून विविध फुलानी,गजरा लावलेल्या, सजवलेल्या कळशी, तांब्यात ठेवून पुन्हा घराकडे घेऊन आल्या. येताना गौरीची विविध गाणी म्हणत आल्या.
घराच्या दरवाज्यापासून ते गणपतीच्या मूर्तीजवळ जिथे गौरीची स्थापना करावयाची असते तिथे पर्यंत लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटविण्यात आले होते. रंगीबिरंगी रांगोळी काढण्यात आली होती. कळशीला गौरीचे मुखवटे बसून ताट -चमचा ,घंटेने वाजवत गौरीचे प्रत्येक घरी स्वागत करण्यात आले. गौरीला छान छान दागिने, फुलांचे हार ,नव्या साड्या नेसवण्यात आल्या होत्या. गौरीसाठी गोडाधोडाच्या जेवणासह 16 भाज्या आणि पंचपक्वानांचा नैवेद्य गौरीला दाखविण्यात आला. गौरी गणपतीचे हे दिवस प्रत्येक घरात अविस्मरणीय आठवणीने भरलेले असतात. प्रत्येक घरात उत्साह, जल्लोष दिसून आला.
प्रत्येक घरातील तरुणी, स्त्रियांनी नऊवारी,सहावारी साडी नेसुन दागदागिने,अंलकार घालुन नटल्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण होते.