वृत्तपत्र विक्रेते लोकशिक्षणाचे दूत - पत्रकार मिलिंद देशपांडे
दत्तवाड प्रतिनिधी:
लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये वृत्तपत्रे महत्वाची जबाबदारी पार पाडतात.वृत्तपत्रांमुळे लोकशाही शासन प्रणाली टिकून आहे. वृत्तपत्रांमुळे लोकशिक्षण घडत असते.सक्षम व सुजाण नागरिक घडविण्याचे कार्य वृत्तपत्रे करत आहेत.ऊन,वारा व पाऊस यांची तमा न बाळगता वृत्तपत्र विक्रेते भल्या पहाटे वृत्तपत्रांचे वितरण करतात. म्हणून वृत्तपत्र विक्रेते लोकशिक्षणाचे दूत आहेत असे प्रतिपादन पत्रकार मिलिंद देशपांडे यांनी केले.विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड येथे आयोजित ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती,वाचन प्रेरणा दिन,वृतपत्र विक्रेता दिन व हात धुवादिन या संयुक्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
त्यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या कोमल चव्हाण यांच्या हस्ते वृत्तपत्र विक्रेत्या कमल विजय कासार यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी वाचन प्रेरणा दिनानिमित पुस्तकांचे वाचन घेण्यात आले.हात धुवा दिनानिमित्त कु.ईश्वरी चव्हाण हिने प्रात्यक्षिक दाखविले. दिलीप चव्हाण या विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांच्या वेशभूषेत वृत्तपत्रांचे वाटप केले.
मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन केले. यावेळी चेअरमन पांडुरंग चव्हाण,प्रमोद पाटील,नामदेव चव्हाण,सरिता राजमाने व विद्यार्थी उपस्थित होते.