श्री दत्त भांडारच्या चेअरमनपदी दामोदर सुतार तर व्हाईस चेअरमनपदी सौ. अनिता अशोक कोळेकर
शिरोळ/प्रतिनिधी:
श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था तथा श्री दत्त भांडारच्या चेअरमनपदी दामोदर सुतार गुरुजी तर व्हाईस चेअरमनपदी सौ. अनिता अशोक कोळेकर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.
जिल्हा सह. निवडणूक अधिकारी तथा जिल्हा निबंधक यांच्या अधिसूचनेप्रमाणे सर्व नवनिर्वाचित संचालकांची पहिली सभा आज संस्थेच्या सभागृहात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी धनाजी पोवार हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
यामध्ये सन 2023 ते 2028 या पंचवार्षिक कालावधीसाठी या निवडी बिनविरोध झाल्या. प्रारंभी चेअरमन पदासाठी दामोदर सुतार यांचे नाव उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी सुचवले. त्यास शामराव पाटील यांनी अनुमोदन दिले. तर व्हाईस चेअरमन पदासाठी सौ. अनिता अशोक कोळेकर यांचे नाव श्रीमती विनया घोरपडे यांनी सुचवले, त्यास आप्पासो मडिवाळ यांनी अनुमोदन दिले.
नवनिर्वाचित चेअरमन दामोदर सुतार आपल्या मनोगतात म्हणाले, 40 वर्षांपूर्वी जेव्हा मॉल, सुपर मार्केट यासारख्या संकल्पना नव्हत्या अशा वेळी स्व. सा. रे. पाटील साहेबांनी कारखाना सभासद तसेच शिरोळ परिसरातील सर्वसामान्य जनतेला सर्व जीवनावश्यक वस्तू अल्प दरात, विश्वासू आणि आपुलकीच्या सेवेतून भांडारच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या. श्री दत्त भांडारच्या सभासदांनीही संस्थेवर विश्वास ठेवल्यानेच संस्थेच्या प्रगतीबरोबरच बिनविरोध निवडणुकीची ही परंपरा कायम ठेवणे शक्य झाले आहे. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची मोठी प्रगती होत आहे. यापुढेही संस्थेच्या माध्यमातून ग्राहकांना विश्वास आणि आपुलकीची सेवा अखंडित सुरू ठेवणार आहोत. गणपतराव पाटील यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच संचालकांचा सत्कार उद्यान पंडित गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
स्वागत जनरल मॅनेजर एस. ए. घोरपडे यांनी केले. यावेळी संस्थेचे सर्व संचालक, संचालिका, जिल्हा निबंधक यांचे सहकारी श्री बागडी, तसेच अकाउंटंट श्री. सय्यद, कॅशियर दीपक ढोणे, परचेस ऑफिसर सुहास मडिवाळ उपस्थित होते.