कर्तव्यनिष्ठ पत्रकार चंद्रकांत भाट
पत्रकारितेच्या माध्यमातून वंचित उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याबरोबरच निकोप समाज निर्मितीसाठी धडपडणारा सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असलेले शिरोळचे कर्तव्यनिष्ठ पत्रकार चंद्रकांत भाट यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त.................. ......
4 जून 1980 रोजी चंद्रकांत भाट यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले त्यामुळे घरची परिस्थिती अतिशय बेताची, प्रतिकूल परिस्थितीवर मात करताना त्यांना नेहमीच त्यांच्या मित्र परिवाराची साथ लाभत असते मात्र समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून समाजसेवेची लहानपणापासून प्रचंड आवड, त्यातून सामाजिक व सार्वजनिक कार्याची धडपड, या धडपडीला धार आली ती पत्रकारितेतून. गेली अनेक वर्षे पत्रकारितेत काम करताना आम्ही चंद्रकांत भाट यांना पाहतो.
मुळातच सामाजिक सेवाभावाचा स्वभाव असल्याने, समाजातील गोरगरीब, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या धारदार लेखनशैलीचा वापर त्यांनी मोठ्या कौशल्याने केला आहे. शिरोळ शहर आणि तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थितीवर आपल्या लिखानातून त्यांनी नेहमीच सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपल्या पत्रकारितेची वेगळी छाप समाज मनावर उमटवली आहे. सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकारिता या दोन्ही बाजूंचा समतोल राखताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी निष्ठा आणि व्रतस्थेची भूमिका ठामपणे घेतली आहे. यामुळे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारा आपला हक्काचा पत्रकार म्हणून त्यांची तालुक्यात ओळख निर्माण झाली त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच शिरोळ
तालुक्यातील प्रत्येक गावात सर्वच क्षेत्रातील, राजकिय पक्ष व गटा तटातील अनेक कार्यकर्ते, नेते यांच्याशी त्यांचा थेट संपर्क आहे. यामुळे कोणाचे कसलेही काम अडकलेच तर सामान्यांची धाव थेट चंद्रकांत भाट यांचेकडेच जाते. प्रशासनातील सर्व विभागांच्या अधिकारी वर्गाशीही त्यांनी सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. त्याचा उपयोग ते अतिशय खुबीने आपल्या सामाजिक कार्यात तसेच सामान्यांच्या न्याय हक्कासाठी करुन घेताना दिसतात. पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक गरजू, गरीब व वंचितांना न्याय मिळवून देताना प्रशासन, राजकीय नेते किंवा समाजहिताच्या आड येणाऱ्यांना त्यांनी अनेकवेळा आपल्या निर्भिड पत्रकारितेतून ठिकाणावर आणत सामान्याना न्याय मिळवून दिला आहे .जनतेचे कोणतेही मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी त्यांना दोन वेळा मिळाली. पत्रकारांच्या न्यायहक्कांसाठी कायम आग्रही असतात. तालुक्यातील अनेक सामाजीक प्रश्नांची आंदोलने, महापूर, कोरोना सारख्या आपत्तीत त्यांनी निर्भिड आणि नि:पक्षपणे सामाजिक भावनेतून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान दिले आहे.
शिरोळ तालुक्यात महापुरा सारख्या उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत असताना तालुक्यातील जनतेच्या मदतीसाठी दिवसरात्र त्यांनी परिश्रम घेतले आहेत. कोविड महामारी काळातही त्यांचे योगदान मोलाचे ठरले होते. कोरोना रुग्णांना वेळेत उपचार व्हावेत, त्यांना वेळेत बेड व औषधे मिळावीत यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यावेळी शिरोळ शहरात लहान मुलांचे कोरोना केअर सेंटर सुरु करण्याचा संकल्प शिरोळकरांनी केला. त्यातही त्यांनी पुढाकार घेऊन कोरोना सेंटर सुरू करण्यासाठी आपल्या सहकारी मित्रपरिवार यांच्या समवेत प्रयत्न केले . त्यामुळे गरजू मुलांच्यावर वेळेत उपचार होऊन ती कोरोना मुक्त झाली. यामुळे समाजाने त्यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित केले सामाजिक क्षेत्रात नि:स्वार्थपणे ते कार्य करीत आहेत. गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे शासकीय दाखले वेळेत मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत असतात तसेच शिरोळ शहरात होणाऱ्या प्रत्येक सामाजिक आणि विधायक उपक्रमात सहभाग घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत शहरात प्रत्येक वर्षी होणारा उरूस तसेच विविध धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमांबरोबरच होणाऱ्या विविध स्पर्धा यासाठी त्यांचं नेहमीच सहकार्य असत
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असल्याने ते सध्या शिरोळ येथिल राजाराम विद्यालय क्र. 2 च्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिरोळ रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सदस्य, शहर व तालुका पत्रकार संघावर कार्यकारिणी सदस्य, राजा शिवछत्रपती मंडळाचे सचिव व बुवाफन महाराज भक्त मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. याशिवाय धार्मिक, सामाजिक कार्यामध्ये नेहमीच पुढाकार घेऊन विधायक कार्य त्यांनी सुरु ठेवले आहे.
अनेकांच्या मदतीला धावून येणारा आपला हक्काचा माणूस म्हणून चंद्रकांत भाट हे संपूर्ण शिरोळ तालुक्यात ओळखले जातात. यामुळेच त्यांना आदर्श पत्रकार आत्मसन्मान गौरव अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सामाजिक बांधिलकी जपतानाच एक निर्भिड आणि कर्तव्यनिष्ठ पत्रकार म्हणून त्यांनी अनेक उपेक्षित प्रश्नांना वाचा फोडली आहे. आपल्या संवेदनशिल पत्रकारितेतून निकोप समाज निर्मितीचा ध्यास घेतलेल्या अशा सामाजिक कार्यकर्त्यास उदंड आयुष्य लाभो यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दीक शुभेच्छा !