अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणार उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची ग्वाही श्री दत्तचा शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता मार्गदर्शन आणि शेतकरी मेळावा उत्साहात
शिरोळ /प्रतिनिधी:
श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने ए. आय. तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम होत असून आगामी काळात कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि श्री दत्त कारखाना संलग्न विचाराने काम करण्यावर भर देणार आहे. नवीन अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन आणि जमीन शाबूत ठेवण्याच्या प्रयत्नाला दत्त कारखाना खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.
समर्थ मंगल कार्यालय, शिरोळ येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित गाळप हंगाम 2023- 24 ऊस पिक स्पर्धा बक्षीस वितरण व आधुनिक शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व विदेशी भाजीपाला उत्पादन व विक्री मार्गदर्शन याविषयी शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे मृदाशास्त्र विशेषज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी 'शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर' याविषयी मार्गदर्शन करताना म्हणाले, शेतीची वाटचाल वेगळ्या पद्धतीने बदलत चालली आहे. वारंवार बदलणाऱ्या निसर्गाबरोबर आपल्याला बदल घडवून शेती केली नाही तर मागे पडू शकतो. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यास मशागत, रोप लागवड, आंतर मशागत, रोग व कीड नियंत्रण, खत, तण, पाणी आणि खोडवा व्यवस्थापन अचूक पध्दतीने करून कमी खर्चात उत्पादन वाढ होण्यास मदत होईल.
प्रकल्प समन्वयक तुषार जाधव यांनी उपग्रह तंत्रज्ञान, ए. आय. संवेदके तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, न्यूरो सेन्स किट, पीक नियंत्रण, सुक्रोजचे प्रमाण, शेतात येणाऱ्या अडचणी, हवामान बदल, माती परीक्षण, पाणी परीक्षण, रोग व किडीचे संभाव्य धोके, ताणतणाव शेतकऱ्यांसमोर रोज येणारी शेतीतील आव्हाने यावर ए. आय. तंत्रज्ञानाने रोजच्या रोज अचूकपणे मार्गदर्शन याची विस्तृत माहिती दिली. तसेच विदेशी भाजीपाला उत्पादन व विक्री', सेंद्रिय शेती, विषमुक्त अन्न, समूह शेती, याविषयीही तुषार जाधव यांनी अनमोल मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली.
गाळप हंगाम 2023-24 मधील ऊस पिक स्पर्धेतील संजय डफळापुरे, भाऊसो पसारे, चंद्रकांत गाताडे, आताऊल्ला पटेल, अभिजीत खोत, संजय पाटील, जंबुकुमार चौगुले या आठ शेतकऱ्यांचा तसेच गाळप हंगाम 2023-24 मध्ये एकरी 100 मेट्रिक टनापेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या आण्णासाहेब मगदूम, वैभव शेरीकर, गणपती नरदे, चैतन्य साजणे, सागर समगे, आदिनाथ लठ्ठे, अशोक चौगुले, सुभाष पाटील, भरत सुतार, जोती गंगधर या दहा शेतकरी सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी केले तर प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगांना यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले. आभार माती परीक्षक ए. एस. पाटील यांनी मानले. यावेळी चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांच्यासह सर्व संचालक, संचालिका, रणजित पाटील, आप्पासाहेब लठ्ठे, महादेव धनवडे आदींसह कारखाना सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.