राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे-गणपतराव पाटील
शिरोळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. अशी माहिती श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दत्त साखर कारखाना निवडणुकीनंतर सहकारमहर्षी गणपतराव पाटील हे शिरोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार अशी चर्चा आहे. काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची त्यांनी मागणी केल्याचे समजते. शिवाय माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली आहे. या पार्श्वभूमीवर दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर अन्य विषयावर आयोजित पत्रकार बैठकीत गणपतराव पाटील यांना विधानसभेच्या संदर्भात विचारले असता गणपतराव पाटील यांनी शिरोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले.
ते म्हणाले, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली असून उमेदवारी मिळाली तर महाविकास आघाडीतून निवडणूक लढविणार आहे. सामान्य नागरिकासह अनेकजण माझ्या निवडणुकीसाठी आग्रह धरत आहे .जनतेच्या भावनेचा आदर करून लोकाग्रहास्तव विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.