Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

शिक्षक : यशाचे खरे शिल्पकार

 


शिक्षक : यशाचे खरे शिल्पकार

         आत्ताच शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीचा निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर झाल्या.

विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश पाहताना सर्वांचे डोळे आनंदाने चमकतात. जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर जेव्हा आपल्या शाळेच्या मुलांचे नाव पहिल्या क्रमांकावर झळकते, तेव्हा गाव, शाळा आणि पालक अभिमानाने फुलून येतात. जयजयकार होत असतो... सर्वत्र विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाचे कौतुक होत असते.


परंतु या सर्व प्रकाशझोतात, एक गडद सावलीत राहणारा, शांतपणे फक्त समाधानाने हसणारा एक महत्त्वाचा घटक असतो - तो म्हणजे शिक्षक.


विद्यार्थ्यांच्या यशामागे फक्त त्यांच्या अभ्यासाची मेहनत नाही, तर शिक्षकांनी घालून दिलेला पाया आहे. प्रत्येक चुकीवर सुधारणा करताना, प्रत्येक अडचणीत धीर देताना, प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिशा दाखवताना जे कष्ट घेतले गेले, ते फार कमी लोकांना दिसतात. शिक्षकांचा प्रत्येक श्वास, प्रत्येक विचार, प्रत्येक कृती विद्यार्थ्यांच्या घडणीकडेच वळलेला असतो.


शिक्षक आपल्या कुटुंबापेक्षा विद्यार्थ्यांना जास्त वेळ देतो, आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक इच्छा बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतो. परीक्षेच्या तयारीच्या काळात ते स्वतःच्या झोपेचा त्याग करतात, विश्रांतीचा विसर पडतो, आणि विशेषतः आपल्या महिला शिक्षक भगिनी आपल्या घराच्या संपूर्ण जबाबदाऱ्या उत्कृष्ट रित्या पूर्ण करीत आपल्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी सतत झटत असतात आणि वर्षभर सातत्याने त्यांच्यासाठी तन-मन-धन लावून श्रम घेतात.तर काही जन वर्ष भर सातत्याने एक ही रजा न घेता अभ्यासात सातत्य राखतात. पण त्यांची तक्रार असते का? नाही. कारण त्यांच्या डोळ्यांसमोर एकच स्वप्न असते - "माझा विद्यार्थी यशस्वी व्हावा."भलेती शिष्यवृत्ती परीक्षा असो, प्रज्ञाशोध परीक्षा असो, नवोदय परीक्षा असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, क्रीडा स्पर्धा असो व इतर स्पर्धा असो.


आज ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे, त्यांच्या यशात शिक्षकांची प्रत्येक शिकवण, प्रत्येक प्रोत्साहन दडलेले आहे. शिक्षकांनी पेरलेले स्वप्नाचे बीज आज फुलले आहे, त्याचा सुगंध सर्वत्र पसरत आहे.


आपण यशाच्या क्षणी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो, त्यांचे कौतुक करतो, परंतु त्या यशाला घडवणाऱ्या शिक्षकांचा योग्य सन्मान किती वेळा करतो? समाजाला ही जाणीव होणे फार आवश्यक आहे की विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विजयामागे शिक्षकांचे अविरत श्रम आणि निस्वार्थ प्रेम असते.


शिक्षक हे कधीही पुढे येऊन स्वतःसाठी वलय मागत नाहीत. ते विद्यार्थ्यांच्या यशातच स्वतःचा आनंद शोधतात. म्हणूनच, त्यांचा सन्मान करणे ही केवळ एक जबाबदारी नसून आपली संस्कृती समृद्ध करण्याची एक पावित्र्यपूर्ण संधी आहे.


आपण सर्वांनी मिळून हे ठरवायला हवे की, ज्या हातांनी आपले भविष्य घडवले, त्या हातांना आदराने पकडून त्यांचे आभार मानूया.


कारण खरे यश म्हणजे विद्यार्थ्यांची चमक आणि शिक्षकांचे अढळ बळ एकत्र असते...

हे विसरता कामा नये.

म्हणून शिक्षक न दिसणारे नायक, न थकणारे मार्गदर्शक आहेत. आणि विद्यार्थ्यांचे यश हे शिक्षकांच्या कष्टांचे प्रतिबिंब आहे.

        मुहम्मद आसिफ खलील मुजावर 

विषय शिक्षक उर्दू विद्यामंदिर घोसरवाड. ता, शिरोळ जि, कोल्हापूर