अंतुर्ली, झित्रेवाडी या गावात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी प्रशांत शरदराव पुजारी यांच्या प्रयत्नांमुळे एस टी बस सेवा सुरू
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागातील अंतुर्ली, झित्रेवाडी या गावात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी प्रशांत शरदराव पुजारी यांच्या प्रयत्नांमुळे एस टी बस सेवा सुरू झाली.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आज सकाळ पर्यंत कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातील पश्चिम भागातील ऐतिहासिक रांगणा किल्ल्यापासून काही अंतरावर वसलेल्या अंतुर्ली, झित्रेवाडी, तांबाळे यासारख्या डोंगराच्या पायथ्याशी आणि जंगल भागात राहणाऱ्या गाव, वाड्या वस्त्यामध्ये एस टी बस सुरू झालेली नव्हती. त्यामुळे या गावातील लोकांना अनेक वर्षे विविध अडचणींना तोंड द्यावे लागत होते. या गावांतील लोकांचे, खास करून आजारी लोकांचे सर्वात जास्त हाल पावसाळ्यात होत होते. तसेच दररोज 5-7 किलोमीटर पायपीट करून लांबच्या शाळेत जाणाऱ्या मुला मुलींचे प्रचंड हाल होत होते. सदर गावातून दिवसातून किमान एक वेळ तरी एखादी एस टी बस सोडावी यासाठी अनेक वर्षे अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करून बघितले. परंतु त्यांना यश येत नव्हते, प्रशासनाकडून दाद घेतली जात नव्हती. पण प्रशांत शरदराव पुजारी यांच्या सातत्य पूर्ण प्रयत्नाने आज पासून त्या सर्व गावकऱ्यांसाठी त्यांच्या गावात हक्काची, कायमची एस टी बस सुरू झाली आणि त्यांच्या जीवनातील सुमारे 77-78 वर्षांचा वनवास संपला.
तेथील ग्रुप ग्रामपंचायतचे नवीन उत्साही लोकनियुक्त सरपंच श्री रामदास देसाई यांनी मागील जानेवारीत याबाबत एस टी व्यवस्थापकांना पत्र दिले होते. परंतु दाद मिळाली नाही. म्हणून पुन्हा त्यानी जून महिन्यात एक स्मरणपत्र दिले. परंतु त्याचीही एस टी प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यानंतर अनेक वेळेला त्यानी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना भेटून पाठपुरावा केला. तरीही त्यांना यश मिळत नव्हते. शेवटी त्यांनी कंटाळून प्रशांत पुजारी याना वैयक्तिक ओळखणाऱ्या अंतुरली गावातील श्री सतीश देसाई यांच्या सांगण्यावरून मागच्या महिन्यात संपर्क केला आणि सर्व परिस्थिती सांगितली. त्यानंतर प्रशांत पुजारी यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न सुरू केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटल्यावर, 'व्यवस्थित' समजावल्यावर अक्षरशः चारच दिवसात नोटीस पत्र काढून त्या गावात एस टी रुटचा सर्वे करण्यासाठी संबंधित कर्मचारी/अधिकारी यांच्यासह एक प्रशिक्षणार्थी एस टी बस सोडली. साधारण एका आठवड्यात सर्वेचा सकारात्मक रिपोर्ट तयार झाला. त्यामुळे त्या भागात एस टी बस सुरू व्हायचा मार्ग मोकळा झाला. परंतु त्यानंतर आगारातून अनेक एस टी बसेस यात्रेसाठी आणि तालुक्यातील विविध गावच्या शाळेतील सहलीसाठी देण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे बसेस उपलब्ध होत नव्हत्या. पण शेवटी जास्त वाट न बघता काल रात्री एस टी प्रशासन, आगार व्यवस्थापक यांना संपर्क करून त्यांनी बसचे नियोजन केले आणि आज सकाळी 9 वाजता पहिली एस टी बस त्या गावात पोचली. अनेक वर्षे, प्रचंड दीर्घ काळ लाल डब्याची डोळ्यात प्राण आणून वाट बघणाऱ्या त्या तीन-साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या दोन-तीन गावातील गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. शाळेत जाणाऱ्या मुलींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.
प्रशांत पुजारी यांच्याकडून झालेल्या सहकार्याबद्दल, प्रयत्नांबद्दल, मदतीबद्दल त्या दोन्ही गावातील समस्त लोकांनी खास निमंत्रण देऊन बोलावून पुजारी यांच्या हस्ते गावात पोचलेल्या पहिल्या एस टी बसचे पूजन केले. यावेळी ग्रुप ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच मा श्री देसाईसो यांनी मा श्री सतीश देसाई, मा डेप्युटी सरपंच शिंदे ताई, सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तांबाळे साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर, चीफ केमिस्ट, कर्मचारी, गावातील नागरिक, महिला भगिनी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत प्रशांत पुजारी यांचा सपत्नीक सत्कार केला...
यासाठी एस टी महामंडळाचे गारगोटी आगार व्यवस्थापक श्री अनिकेतजी चौगले, स्टँड इन्चार्ज सागर पाटील यांचे खूप सहकार्य मिळाले.


