गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी २५ उमेदवार निवडून आणा : नामदार हसन मुश्रीफ शिरोळ तालुक्यात ठराव धारकांचा मेळावा संपन्न
गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी २५ उमेदवार निवडून आणा : नामदार हसन मुश्रीफ
शिरोळ तालुक्यात ठराव धारकांचा मेळावा संपन्न
दत्तवाड ------
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे २५ पैकी २५ उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी शिरोळकरांनी घ्यावी. विरोधकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वेगळ्या असून, स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यांच्या टीकेला बळी न पडता मतदारांनी एकजुटीने महायुतीच्या पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. पॅनेल टू पॅनेल मतदानासाठी नियोजनबद्ध यंत्रणा उभी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गोकुळ दूध संघ हा दूध उत्पादक शेतकरी आणि महिला भगिनींच्या कष्टाला आर्थिक मूल्य देणारा महत्त्वाचा आधार आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्याबरोबरच म्हशींच्या दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी अनुदान आणि पशुपालकांना प्रोत्साहन देण्यावर भर द्यावा लागेल. तसेच गोकुळमध्ये शिरोळ तालुक्याला न्याय देण्यासाठी सभासदसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या ठरावधारकांचा मेळावा जैनापुर येथे संपन्न झाला. यावेळी नामदार मुश्रीफ बोलत होते.
स्वागत आघाडीचे उमेदवार रणजित पाटील यांनी केले. प्रास्ताविक आणि उमेदवारांची ओळख अजित नरके यांनी केले.
यावेळी नामदार मुश्रीफ पुढे म्हणाले, गोकुळ दूध संघ हा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य देणारा महत्त्वाचा आधार आहे. विशेषतः दूध व्यवसायात मोठ्या प्रमाणावर योगदान देणाऱ्या माता-भगिनींच्या कष्टाला आर्थिक मूल्य मिळवून देण्याचे काम संघाच्या माध्यमातून होते. दूध उत्पादकांना दर दहा दिवसांनी पैसे मिळत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले असून, त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी गोकुळ दूध संघाने अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे, असे मत नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये म्हशीच्या दुधाला चांगली मागणी व किंमत मिळत असल्याने म्हशींचे दूध उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी पशुपालकांना चांगल्या जातीच्या म्हैशी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिक मदत देणे महत्त्वाचे आहे. हरियाणा, पंजाब येथून म्हशी आणण्यासाठी अनुदान देण्याच्या निर्णयाचा उल्लेख करत त्यांनी भविष्यात हे अनुदान वाढविणार असल्याचे सांगितले. म्हैस खरेदी केल्यानंतर ती दूध उत्पादकांसाठी फायदेशीर ठरेल, याची खात्री देणारी व्यवस्था उभी राहिली पाहिजे. संचालकांनी प्रामाणिकपणे आणि कष्टपूर्वक काम करून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक चांगला दर देण्याबरोबरच पशुखाद्याची गुणवत्ता सुधारणे, वैद्यकीय उपचार व्यवस्था सक्षम करणे आणि दूध उत्पादक महिलांसाठी विमा तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावावे, यासाठी नवीन संचालक मंडळाने नावीन्यपूर्ण योजना राबवाव्यात, असे त्यांनी सांगितले.
गोकुळ दूध संघाने सुमारे ७०० लिटर दूध संकलनापासून २० लाख लिटरपर्यंत मजल मारली असून, दूध उत्पादकांच्या विश्वासामुळेच हा ब्रँड देशभरात लोकप्रिय झाला आहे. दूध व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी दूध पावडर, चीज, आईस्क्रीम यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ दूध उत्पादकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व २५ उमेदवारांना शिरोळ तालुक्यातून पॅनेल टू पॅनेल मतदान होईल. शिरोळ तालुक्यातील सुमारे २७० दूध संस्थांपैकी २०० हून अधिक ठरावधारक महायुतीच्या पाठीशी असून, तालुक्यातील मतदार सर्व उमेदवारांना मतदान करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या १२ ते १३ वर्षांपासून गोकुळ दूध संघात शिरोळ तालुक्याला संचालकपदापासून वंचित राहावे लागले आहे. पूर्वी शिरोळ तालुक्याचा स्वतंत्र दूध संघ होता; मात्र संघर्ष आणि आर्थिक अडचणींमुळे तो बंद पडला. त्यामुळे गोकुळमधील तालुक्याचे सभासदत्व मर्यादित राहिले. गेल्या पाच वर्षांत सभासदसंख्या वाढून सुमारे २७० झाली आहे. तालुक्यातील आणखी सुमारे ५०० दूध उत्पादकांना सभासद करून घेण्यासाठी नवनिर्वाचित संचालकांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
शिरोळ तालुक्यात सहकाराची मजबूत परंपरा असून, दूध उत्पादक संस्थांनी दूध संकलन वाढविण्यावर भर द्यावा. म्हशींच्या दूध उत्पादनवाढीसाठीही तालुक्यात प्रयत्न सुरू आहेत. गोकुळमध्ये शिरोळ तालुक्याला भविष्यात आणखी प्रतिनिधित्व मिळावे आणि कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षाही आमदार यड्रावकर यांनी व्यक्त केली.
यावेळी विश्वास पाटील (आबाजी), विद्याधर कुलकर्णी, माजी आमदार उल्हास पाटील यांची मनोगते झाली.
यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार राजेश पाटील, सुजित मिणचेकर, नाविद मुश्रीफ, शौमिका महाडिक, संजय पाटील यड्रावकर, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, बाळासाहेब खाडे, अमरसिंह पाटील, रामचंद्र डांगे, सतिश मलमे, प्रकाश पाटील टाकवडेकर, मल्लापाण्णा चौगुले, धनाजीराव जगदाळे यांच्यासह उमेदवार राजेश पाटील, अरुणराव डोंगळे, राहुल उर्फ पी. एन. पाटील, रणजित उर्फ के. पी. पाटील, युवराज पाटील, सतीश पाटील, अर्चना उर्फ ए. वाय. पाटील, रणजीत पाटील, शौमिका महाडिक, अंबरीशसिंह घाटगे, चेतन नरके, दीपक पाटील, अशोक चराटी, प्रतापसिंह पाटील, विश्वास जाधव, विश्वास पाटील (आबाजी), अजित नरके, संभाजी पाटील, अजित पाटील, ॲड. वीरेंद्र मंडलिक, मदन देसाई, डॉ. सुजित मिणचेकर, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील यांच्यासह शिरोळ तालुक्यातील दूध संस्थांचे ठराव धारक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले. आभार अमरिश घाटगे यांनी मानले.
