शेतीच्या वीजेची कपात बंद करा: अन्यथा आंदोलन*
*शेतीच्या वीजेची कपात बंद करा: अन्यथा आंदोलन*
सध्या महावितरण कंपनीकडून शेतीला पुरवल्या जाणाऱ्या वीजेमध्ये फोर्स लोड शेडिंगच्या नावाखाली कपात केली जात आहे. मुळात शेतीकरिता महावितरण कंपनीकडून फक्त आठ तासांचा वीज पुरवठा केला जातो, तोही रात्री अपरात्री केला जातो. आणि सध्या त्यातही मोठी कपात केली जात आहे. ही कपात त्वरित थांबली पाहिजे यासाठी कसबा सांगाव, सुळकूड परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने कागल येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयातील अधिका-यांना निवेदन देणेत आले.
यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आला आहे. पुरेश्या पावसाअभावी पिके वाळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या आधारावर शेतकरी पिके जगवण्याचा प्रयत्न करतो आहे, पण आस्मानी संकट संपत नाही तोपर्यंत महावितरणच सुलतानी संकट उभे ठाकले आहे. महावितरणच्या वतीने एका एका विभागात तीन तीन दिवस सलग वीज कपात केली जात आहे. शेतीला चालू असणारा वीज पुरवठा अचानक बंद केला जातो, बंद केलेला
पुरवठा कधीही सुरू केला जातो. यासंदर्भात कोणतीही पूर्वसूचना महावितरणकडून दिली जात नाही. यामुळे शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आला आहे.
यामुळे महावितरणने ही वीज कपात त्वरित थांबवावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आली.
यावेळी प्रभू भोजे, अविनाश मगदूम, राजू पाटील, संजयकुमार पाटील, चंद्रकांत पाटील, युवराज पाटील, बाळासाहेब पाटील, अरूण मुद्दान्ना, संतोष मगदूम, दिलीप मगदूम व अन्य शेतकरी उपस्थित होते.