जीवनात ध्येय आवश्यक - शिक्षणाधिकारी : मीना शेंडकर पद्माराजे विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात
शिरोळ : प्रतिनिधी :
जीवनात ध्येय निश्चित करा, आपल्यातील सुप्तगुण शोधा, झोपेत स्वप्ने न बघता झोप उडवणारी स्वप्ने बघा, कष्ट करण्याची तयारी ठेवा यश नक्की मिळेल असे मत कोल्हापूर जिल्हा माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी व्यक्त केले.
येथील श्री पद्माराजे विद्यालय जुनिअर कॉलेज, व्यवसाय शिक्षण विभाग आणि सौ रुक्मिणी पांडुरंग माने रहिमतपूरकर कन्या विद्यालय शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंती आणि पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील हे होते.
सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मी वहिनी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर ए. एम.कल्लण्णावर आणि विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व रयत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अहवाल वाचन विद्यालयाचे प्राचार्य ए.ए.मुल्ला आणि कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.पी.ए हेरवाडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय ए. व्ही. जाधव यांनी करून दिला. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दलित मित्र डॉ अशोकराव माने यांनी विद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून विद्यालयास सदैव मदतीसाठी तयार असल्याचे मत व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूरचे अध्यक्ष सुदर्शन कदम यांनी जीवनातील येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जा यश नक्की मिळेल असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी शिरोळच्या शैक्षणिक विकासामध्ये विद्यालयाचे स्थान अढळ असून इथून पुढच्या काळात सुद्धा अशाच पद्धतीने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी बजरंग काळे ,सुभाष माळी, खंडेराव हेरवाडे, शिवाजीराव माने देशमुख, नारायण महात्मे, जी. एस. पाटील, अविनाश सूर्यवंशी आदी मान्यवर तसेच शाळेचे अध्यापक अविनाश माने, विनोद मगदूम, एस. एम. माने, आर. टी. कोळके, ए.डी . पुजारी,व्ही.ए.गवंडी, आर सी नाईक, बी. एस. गुरव, एम.आर. पाटील, एम. एन.पाटील, सौ तांबोळी, श्रीमती एस. एस. देशमुख,सौ. व्ही.व्ही.पाटील तसेच स्कूल कमिटी सदस्य,सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार उपमुख्याध्यापक टी. आर. गंगधर यांनी आभार मानले.