राधानगरी धरणाबरोबरच आजपासुन कोयना...वारणा धरणातुनही विसर्ग सुरु.नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
*राधानगरी धरणाबरोबरच आजपासुन कोयना...वारणा धरणातुनही विसर्ग सुरु.नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*.
शिरोळ तालुक्यावर पुन्हा पुराची टांगती तलवार
राधानगरी धरणातील विसर्गानंतर आता कोयना व वारणा धरणातुनही आज सकाळपासुन विसर्ग सुरु करण्यात आला आहे.यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होणार असुन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेले दोन तीन दिवस धरणपाणलोटक्षेत्रासह सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली आहे.यामुळे धरण पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.परिणामी धरणाची पाणी पातळी नियत्रिंत करण्यासाठी आज शनिवार 26 जुलै सकाळी 11 वाजल्यापासुन कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटाने उघडुन 16,565 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे.तर यापुर्वीच धरण पायथा विद्युतगृहातील दोन्ही युनिट सुरु असुन याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सुरु आहे.कोयनाधरणातुन असा एकुण 18665 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे.
*वारणा धरणातून विर्सग*
तर वारणा धरणपाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टी होत असल्याने धरण पाणी साठ्यात सतत वाढ होत आहे.यामुळे जलाशय परिचलन सुचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज शनिवारी 26 जुलै सकाळी 6 वाजल्यापासुन धरणाच्या वक्र दरवाज्यातुन 8630 क्युसेक व विद्युतगृहातुन सुरु असलेला 1630 क्युसेक असा एकुण 10260 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात येत आहे.पाऊस कमी अथवा वाढल्यास ,धरणात पाण्याची आवक वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी - जास्त करण्यात येणार आहे.
राधानगरीचे ४ स्वंयचलित दरवाजे उघडले*
गेले दोन तीन दिवस धरणपाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे.यामुळे राधानगरी धरणाचे ४ स्वंयचलित दरवाजे उघडले आहेत.यातुन एकुण ५७१२ क्युसेक व धरणपायथा विद्युतगृहातुन १५०० क्युसेक असा एकुण ७२१२ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.
सततच्या पावसामुळे राधानगरी धरण पाणी साठ्यात वाढ होत आहे.यामुळे गुरुवारी रात्री १० वाजुन ३ मिनिटानी धरणातील स्वंयचलित दरवाजा क्रंमाक ६ उघडला.यानंतर रात्री १० वाजुन ५ मिनिटानी दरवाजा क्रमांक ३ ,रात्री ११ वाजुन ११ मिनिटानी दरवाजा क्रमांक ५ उघडला गेला.तर आज शनिवारी पहाटे ४ वाजुन ३६ मिनिटानी दरवाजा क्रमांक ४ उघडला गेला आहे.
राधानगरी धरणाचे चार स्वंयचलित दरवाजे उघडले असुन यातुन एकुण ७२१२ क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु आहे.यामुळे नंद्याच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान शिरोळ तालुक्यातही आज पहाटेपासुन पावसाची रिपरिप सुरु झाली आहे.
विविध धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे.यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान शिरोळ तालुक्यातही काल रात्रीपासुन पावसाने जोर धरला आहे.आज सकाळपासुन क्षणात पाऊस पडतो.तर लगेच दोन मिनिटांत ऊन पडते यामुळे तालुक्यात ऊन- पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे.
शिरोळ तालुक्यातील कृष्णा - पंचगंगा नदीचे पाणी आत्ता कुठे पात्रात विसावत होते.यामुळे नदीकाठावरील गावांनी पुरापासुन सुटकेचा सुस्कारा घेतला होता. मात्र राधानगरी.....कोयना....वारणा धरणातुन आजपासुन मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु केल्यामुळे येथील कृष्णा - पंचगंगेच्या पाणी पातळीत पुन्हा झपाट्याने वाढ होणार आहे.परिणामी नदीकाठच्या ग्रामस्थामध्ये धाकधुक वाढली आहे.
