शरीरावर शिवत्व प्रतिष्ठीत करुन परमेश्वरांशी एकरूप होण्याची जीवन प्रणाली म्हणजे लिंगायत धर्म -राजशेखर तंबाके श्रावणमास रविवारीय व्याख्यानमाला
शरीरावर शिवत्व प्रतिष्ठीत करुन परमेश्वरांशी एकरूप होण्याची जीवन प्रणाली म्हणजे लिंगायत धर्म -राजशेखर तंबाके
श्रावणमास रविवारीय व्याख्यानमाला
दत्तवाड:प्रतिनिधी : सुख शांतीसाठी विविध पूजा पाठ,प्रार्थना करुन समस्या सुटतात का? नामस्मरणाने शांती का मिळत नाही?याचा विचार करण्याची गरज आहे.परमेश्वरापर्यंत आपली भक्ती का पोहोचत नाही.कर्म करुन ही मन: शांती मिळत नाही याचा अर्थ आपण कोठेतरी चुकतोय.आपल्यामध्ये शांती कोठे आहे?याचा शोध घेवून मन शांत व स्थिर ठेवणे आवश्यक आहे. मनाच्या शुद्धीकरण प्रक्रियेला धर्म म्हणतात.तुमचं मन शांत व स्थिर असेल तर तुम्ही धार्मिक.धर्म यासाठी असतो की मनात येणा-या विचारांचे निरीक्षण करणे आणि जीवनाच्या समस्या सोडविणे."शरीरावर शिवत्व प्रतिष्ठीत करुन परमेश्वरांशी एकरूप होण्याची जीवन प्रणाली म्हणजे लिंगायत धर्म होय."
असे प्रतिपादन श्री वीरशैव लिंगायत समाज ट्रस्ट कुरुंदवाड यांच्या वतीने श्रावणमासा निमित्त आयोजित कल्लेश्वर मंदिर, कुरुंदवाड येथील 'लिंगायत धर्म आणि शिवयोग साधना' या विषयांवरील व्याख्यानाच्या अनुषंगाने राजशेखर तंबाके (अध्यक्ष,कोल्हापूर लिंगायत समाज संस्था, कोल्हापूर ) बोलत होते.प्रारंभी शिव योगसाधनेने व्याख्यानास सुरुवात झाली.अध्यक्ष स्थानी किशोर खोत होते.स्वागत ॲड.देवराज मगदूम यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय सच्चिदानंद आवटी यांनी करुन दिला.
याप्रसंगी डॉ.मनोहर कोरे,महादेव मगदूम,स्वप्नील कुंभार,रामचंद्र आंबी, दिलीप मठपती,अमित जंगम,महादेव माळी,सुरेश फल्ले,प्रकाश फल्ले,दिलीप हलवाई,सुरेश निपाणे,मल्लया स्वामी यांचे सह समाज बांधव,नागरीक उपस्थित होते.
