ऑनलाईनच्या बदलीचा गोंधळ थांबता थांबेना.
कोल्हापूर :सातत्याने चर्चेत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या सुरु असलेल्या ऑनलाईनच्या बदलीचा गोंधळ थांबता थांबेना.वेबसाईटवर ओटीपी न येणे. ओटीपी आल्यावरही ओपन न होणे, भरलेल्या शाळा न दिसणे,पसंतीक्रम आपोआप बदलणे,सेव्ह केलेल्या शाळा न दिसणे अशा अनेक समस्यांनी जिल्हा परिषद बदली पात्र शिक्षक त्रस्त झाले आहेत.
न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष लागून असलेल्या शिक्षकांनी नशीबावर हवाला ठेवून राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी विशेषतः संवर्ग ४ मधील शिक्षकांनी ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात केली होती.पण बुधवार रात्री १० वाजल्यापासून गुरुवार रात्रीपर्यंत प्रॉब्लेम सुरू होता. येनकेन प्रकारे लॉगीन करूनही वेबसाईटला विविध प्रकारे प्रॉब्लेम येत होता. संवर्ग४मधील बदली पात्र शिक्षकांना रिक्त जागा व बदली पात्र शिक्षकांच्या जागा सेवा जेष्ठतेनुसार व योग्य पसंतीक्रमाने भरल्या नाहीत तर टप्पा क्रमांक ७ मधील विस्थापित होवून दुर्गम व अडचणीच्या ठिकाणी बदलीने शाळा मिळणार असल्याने संवर्ग४मधील बदली पात्र शिक्षक त्रस्त झाले आहेत. चार दिवसाच्या मुदतीत बहुसंख्येने जास्त असणाऱ्या संवर्ग ४ मधील बदली पात्र शिक्षकांना बदली फॉर्म भरणेसाठी मुदतवाढ मिळणेविषयी सर्व शिक्षक संघटनांनी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
ग्रामविकास विभागाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
