मूल्यवर्धन ३.० तालुका केंद्रस्तरीय प्रशिक्षणास सुरुवात शिरोळ तालुक्यात ११ प्रशिक्षण केंद्रे.
मूल्यवर्धन ३.० तालुका केंद्रस्तरीय प्रशिक्षणास सुरुवात
शिरोळ तालुक्यात ११ प्रशिक्षण केंद्रे.
दत्तवाड:प्रतिनिधी :भारताच्या संविधानात अंतर्भूत असलेली मूल्ये व त्यासंदर्भातील इतर मूल्ये आणि क्षमता शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलांमध्ये विकसित करण्यास मदत करणे.मुलांना स्वतःची,स्व- विकासाची आणि आपल्या जबाबदाऱ्यांची ओळख करून देणे. शालेय विद्यार्थी,भविष्यात लोकशाहीतील जबाबदार,संवेदनशील आणि मूल्याधिष्ठित नागरिक व्हावेत हा या कार्यक्रमाचा उद्देश्य आहे.महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'मूल्यवर्धन ३.० प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा पहिला टप्पा २५ ते २७ सप्टेंबर तर दुसरा टप्पा २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ अखेर आहे.
सर्व शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शिक्षण संस्थेतील इयत्ता १ली ते८वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी मूल्यवर्धन ३.० तालुका केंद्रस्तरीय प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाला शिरोळ तालुक्यातील ११ केंद्रावर गुरुवारी सुरूवात झाली.शिरोळ तालुक्यातील १३४ प्राथमिक व ७३ माध्यमिक शाळेतील ९५० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.२७ तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.पहिल्या टप्प्यात ४८६ तर दुसऱ्या टप्प्यात ४६४ शिक्षक सहभागी होणारे आहेत.
दरम्यान दानोळी हायस्कूल येथील प्रक्षिक्षण केंद्रास गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी यांनी भेट देवून मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबत शिक्षण विस्तार अधिकारी रमेश माळी व सौ. वर्षा लोकरे उपस्थित होते.सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख,विशेष शिक्षक यांचे प्रशिक्षणासाठी सहकार्य लाभले.
दरम्यान दत्तवाड केंद्रातील शिक्षकांच्या प्रशिक्षणास श्रीमती आक्काताई नाना नेजे हायस्कूल येथे केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे यांच्या नियोजनात सुरुवात झाली.दत्तवाड केंद्रातील ४४ शिक्षक सहभागी झाले आहेत. तर उर्वरित शिक्षक दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणार आहेत.राज्य तज्ञ मार्गदर्शक नंदकुमार मोटे व सौ.अर्चना पाटील मार्गदर्शन करीत आहेत.
