कुरुंदवाडमध्ये राजर्षी शाहू आघाडीची लाट मनीषा डांगे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
कुरुंदवाडमध्ये राजर्षी शाहू आघाडीची लाट
मनीषा डांगे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
कुरुंदवाड :( मिलिंद देशपांडे)
कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू विकास आघाडीचा जोर दिवसेंदिवस वाढत असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा डांगे तसेच सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहराच्या विकासाची वाटचाल आणि प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक शाहू आघाडीच्या माध्यमातूनच शक्य असल्याचा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
प्रचार फेरीदरम्यान मतदारांशी संवाद साधताना मनीषा डांगे म्हणाल्या, कुरुंदवाड शहराची रखडलेली नळपाणी योजना ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकारातून ही योजना निश्चित पूर्ण केली जाईल. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न संपुष्टात आणून प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ व शाश्वत पाणीपुरवठा पोहोचवणे हे आमचे सर्वात मोठे प्राधान्य आहे.
त्या पुढे म्हणाल्या, कुरुंदवाड शहराचा विकास आधुनिक पातळीवर नेण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडी कटिबद्ध आहे. शहराची वाहतूक व्यवस्था, रस्ते, गटारी, प्रकाशयोजना, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा या सर्व क्षेत्रांत आम्ही व्यापक व नियोजनबद्ध सुधारणा करणार आहोत. आमदार यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदवाडला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न वेगाने सुरू राहतील.
शहरातील प्रत्येक प्रभागात शाहू आघाडीच्या उमेदवारांना मिळत असलेला लोकसहभाग उल्लेखनीय आहे. महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक यांनी प्रचारफेरीला गर्दी करून विकासाचा मुद्दा अग्रस्थानी ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रभागांतून उमटणारा प्रतिसाद पाहता आघाडीचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे.
गेल्या काही वर्षांत झालेली विकासकामे, नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा वेगवान प्रयत्न आणि प्रामाणिक प्रशासनाची वचनबद्धता यामुळे शाहू आघाडीविषयी जनमानसात सकारात्मकता वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शहराच्या भविष्यासाठी विश्वासार्ह नेतृत्वाची गरज असल्याचे अनेक नागरिकांनी मत व्यक्त केले.
निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचत असताना राजर्षी शाहू विकास आघाडीचा वाढता प्रभाव आणि मनीषा डांगे यांच्या नेतृत्वाला मिळणारा प्रतिसाद पाहता, कुरुंदवाडमध्ये आघाडीची पकड अधिक घट्ट होत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
