Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दत्तवाड मतदारसंघात स्थानिक नेतृत्वालाच मतदारांचा कौल, दिपाली पाटील यांच्याभोवती जनसमर्थनाची लाट



दत्तवाड / प्रतिनिधी 

दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून,स्थानिक उमेदवार दिपाली उदय पाटील यांच्या बाजूने ठाम जनमत तयार होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.कष्टकरी,शेतमजूर, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा त्यांना मिळत असून, “स्थानिक उमेदवारालाच संधी” हा सूर मतदारसंघात ठळकपणे उमटत आहे.दिपाली पाटील या दत्तवाड परिसरातीलच असल्याने गावागावातील मूलभूत प्रश्न,पाणीटंचाई,रस्ते,रोजगार,आरोग्य व शिक्षणासारख्या ज्वलंत समस्यांची त्यांना प्रत्यक्ष जाण आहे.गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक कार्यात सक्रिय असून, सामान्य जनतेच्या अडचणींमध्ये त्या सातत्याने सहभागी राहिल्या आहेत.त्यामुळे केवळ आश्वासनांची नव्हे, तर काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याचे मत मतदारांमधून व्यक्त होत आहे.



निवडणुकीच्या काळात जिल्ह्याबाहेरून अनेक तथाकथित ‘मोठे नेते’ दत्तवाडमध्ये दाखल होऊन गगनभेदी भाषणे आणि आश्वासने देतात,मात्र निवडणूक संपताच ते दिसेनासे होतात, अशी तीव्र नाराजी नागरिकांमध्ये आहे. “आम्हाला फोटोत दिसणारा, शेतकऱ्यांना फसविणारा नव्हे,तर प्रत्यक्ष भेटून प्रश्न सोडवणारा उमेदवार हवा,”अशी स्पष्ट भूमिका मतदारांनी घेतली आहे.दिपाली पाटील यांचा थेट जनतेशी संवाद,साधी जीवनशैली आणि प्रश्न सोडवण्यासाठीची ठाम भूमिका यामुळे त्या इतर उमेदवारांपेक्षा वेगळ्या ठरत आहेत.जिल्हा परिषदेत गेल्यास दत्तवाड मतदारसंघाचा बुलंद आवाज बनून प्रभावी नेतृत्व देतील,असा विश्वास सर्वसामान्य मतदार व्यक्त करत आहेत.एकंदर पाहता,दत्तवाड मतदारसंघात यावेळी बाहेरून येणाऱ्या नेत्यांना नव्हे,तर स्थानिक,लढवय्या आणि जनतेशी नाळ जोडलेल्या उमेदवारालाच संधी देण्याचा निर्धार मतदारांनी केल्याचे चित्र स्पष्ट होत असून,त्याचा सर्वाधिक फायदा दिपाली उदय पाटील यांना होताना दिसत आहे.